अपराध समाचार
ऐरोलीतील गोळीबारप्रकरणी तिघांना अटक
- 255 Views
- July 17, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on ऐरोलीतील गोळीबारप्रकरणी तिघांना अटक
- Edit
ऐरोलीतील एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी मात्र फरार आहे. दोघांना घाटकोपर पोलिसांनी अटक करून रबाळे पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले असून एकाला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे.
सई गोगळे, मंदार गावडे, मितेश साळवी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी अमित भोगले
फरार आहे. अटक तिन्ही आरोपी भोगले याच्या गटातील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. फिर्यादी आदित्य क्षीरसागर याने दिलेल्या फिर्यादीत यांचीही नावे आहेत.
रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ऐरोली येथील गरम मसाला हॉटेलमध्ये भांडुप येथील एका टोळीतील या दोन गटांत असलेल्या वादातून आरोपी अमित भोगले याने फिर्यादी आदित्य क्षीरसागर याच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. मात्र क्षीरसागर यात वाचला होता. गोळीबारानंतर आरोपी अमित भोगले व रामचंद्र राऊत यांनीही येथून पळ काढला होता.
घाटकोपर पोलिसांच्या युनिट एकने सई गोगळे आणि मंदार गावडे यांना ताब्यात घेत सोमवारी रात्रीच रबाळे पोलिसांच्या ताब्यात दिले, तर रबाळे पोलिसांनी मितेश साळवी याला मंगळवारी सकाळी भांडुप येथून अटक केली आहे. याच प्रकरणात रबाळे पोलिसांनी ठाण्याचे शिवसेना नगरसेवक संजय भोईर यांचीही चौकशी सुरू होती. मात्र भोईर यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे, याबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली आहे.
गोळीबारप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपी हे मुंबई व ठाणे परिसरातील असून आरोपी व फिर्यादी यांच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.