गदारोळामुळे विधानसभा तहकूब
- 238 Views
- July 02, 2019
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on गदारोळामुळे विधानसभा तहकूब
- Edit
पालघरमध्ये रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली. मुंबई आणि गुजरातकडे जाणाऱ्या काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या. आज आठवडय़ाचा पहिलाच दिवस असल्याने कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना तसेच रेल्वे प्रवाशांना मोठय़ा गैरसोयीला समोर जावे लागले.
तर रविवारी रात्री सुरू झालेल्या संततधार पावसामुळे डहाणूच्या ग्रामीण भागात नद्या-ओहोळ दुथडी भरून वाहू लागले. ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन प्रमुख राज्य मार्गावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली. पावसामुळे डहाणूतील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली.
मुसळधार पावसामुळे पालघर तालुक्यात सर्व ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारी रात्रभर पाऊस सुरू होता. त्यामुळे नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले. मासवण येथील सूर्या नदी दुथडी भरून वाहू लागल्याने शहरासह आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरले. वाघोबा येथील धबधबाही ओसंडून वाहत आहे. गोवडे येथे गावतलाव बांध फुटल्याने त्यातील पाणी पूर्ण गावात शिरले. पंचाळी आगवन येथील गाव पाण्याखाली गेले.
पालघर, बोईसर, सफाळे परिसरांत बाजारपेठा, भाजी मंडईतही दुकानात पाणी शिरले. तर पालघरमधील मोहपाडा, कमला पार्क, न्यायालय परिसर, गोठणपूर, पालघर पूर्व भाग आदी परिसरांत पाणी साचले. हे पाणी येथील नागरिकांच्या घरात शिरून जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले. लोकमान्य नगर परिसरातील सखल भागात पाणी साचल्याने येथील शाळा बंद ठेवण्यात आल्या.
ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. याची खबरदारी म्हणून पालघरमधील शाळाही बंद ठेवण्यात आल्या. बेटेगाव येथे एक कार पाण्यात गेली. रविवारी केळवे येथे फिरायला आलेल्या पर्यटकांचे वाहन खाडी परिसरात अडकले.
मनोर-मासवण पूल बंद
तालुक्यातील तांदूळवाडी घाटात दगड, माती, झाडे रस्त्यावर पडली. येथील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली. मनोर मासवणमधील पूल सूर्या नदीच्या पाण्याने दुथडी भरून वाहात असल्यामुळे हा पूल काही काळ बंद ठेवण्यात आला होता. गेले अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने जोरदार सुरुवात झाल्याने चिंतेत असलेला शेतकरी मात्र यामुळे सुखावला आहे. पावसाने उघड दिल्यानंतर येथील शेतीत पेरणीची कामे सुरू होतील.