देश
पाण्याच्या उधळपट्टीवर अंकुश
एकीकडे शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण केवळ ५० टक्केच भरले आहे, तर दुसरीकडे नागरिकांकडून पाण्याची वारेमाप उधळपट्टी केली जात आहे. शहरी भागांत नियमानुसार लोकसंख्येनुसार प्रतिमाणसी २०० लिटर पाणी देण्याची आवश्यकता असते, मात्र नवी मुंबईत हेच प्रमाण ४०० लिटर प्रतिमाणसी असल्याने पाण्याच्या उधळपट्टीवर अंकुश लावण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
नवी मुंबई शहरात गृहसंस्थामध्ये २४ तास पाणी असते. त्यामुळे पाण्याचा अतिरिक्त आणि नाहक वापर केला जात असल्याचे पालिका प्रशासनाच्या लक्षात आल्याने मोठय़ा संकुलांना लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा करण्याचा विचार पालिका प्रशासन करत आहेत. पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्या पुढाकारातून शहरातील पाण्याच्या उधळपट्टीची माहिती जमा करण्यात आली आहे. शहरात पाण्याचा अतिवापर करणाऱ्या मोठय़ा संकुलांना प्रतिमाणसी नियमानुसार पाणी देताच ऑटो कटमीटरद्वारे पाणीपुरवठा बंद करण्याचे प्रयोजन असून पालिका प्रशासनाने याबाबतच्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
नवी मुंबई महापालिकेकडे स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असल्याने शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत नव्हते. परंतु धरणाची पातळी गतवर्षीपेक्षा सात मीटरने अधिक खाली गेल्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून १० टक्के पाणीकपात सुरू केली.
एकीकडे शेजारच्या पनवेल शहराला दरवर्षी पाणीटंचाईची झळ बसत असताना नवी मुंबईत मात्र पाण्याची दौलतजादा सुरू आहे. लोकसंख्येच्या मानाने नियमानुसार प्रतिमाणसी १३५ लीटर पाणी देण्याची आवश्यकता आहे, तर शहरी भागात हे प्रमाण २०० प्रतिमाणसी मानले जाते. परंतु शहरात मात्र नियमापेक्षा अधिक पाणीपुरवठा होत आहे. काही सोसायटय़ांना आवश्यकतेनुसार अधिक पाणीपुरवठा होत आहे. पालिका आयुक्तांच्या आदेशाने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आठ विभाग कार्यालयामार्फत अतिरिक्त पाणीपुरवठय़ाबाबत माहिती जमवली आहे. संकुलांना प्रतिमाणसी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा झाला की तेथील पाणीपुरवठा आपोआप ऑटो कटमीटरद्वारे बंद करण्याबाबतचा पालिकेचा प्रयत्न आहे.
उत्पन्न कमी, खर्च अधिक
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठय़ासाठी वर्षांला १०८ कोटी खर्च येत असून पाणी देयकातून फक्त ८० कोटी रुपये मिळत आहे. केंद्राच्या जेएनएनआरयूएम योजनेअंतर्गत पाणीपुरवठय़ासाठी दोनशे तीस कोटी रुपये खर्चातून पाणीपुरवठा व्यवस्था उभारली. परंतु पाणीदर मात्र जैसे थे स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासकीय नियमानुसार देखभाल दुरुस्तीचा वार्षिक खर्च व पाणीदेयकापोटी मिळणारी वसुली याचा ताळमेळ न साधल्याने पालिकेला वार्षिक २७ कोटींचा फटका बसत आहे.
अतिरिक्त पाणीपुरवठय़ाबाबत मोठय़ा संकुलांची माहिती संकलित केली आहे. याबाबत आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
– मनोहर सोनावणे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोठय़ा संकुलांना अतिरिक्त पाणीपुरवठा होत आहे. अशा संकुलांच्या पाणीपुरवठय़ाची माहिती जमा केली आहे. काही ठिकाणी प्रतिमाणसी २०० ऐवजी ४०० लीटर प्रतिमाणसी पाणीपुरवठा होत असल्याने आवश्यक तेवढा पाणीपुरवठा झाल्यास अत्याधुनिक पद्धतीने ऑटो कटमीटर लावण्याबाबत प्रशासन प्रयत्नशील आहे.