देश
‘पुणेकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा!’, प्रशासनाचा इशारा
राज्याची राजधानी मुंबईला पावसाने झोडपले असतानाच पुण्यातही पुढील काही तासांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाने केले आहे. मुंबईमध्येही आज दिवसभरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबईकरांच्या सुट्टीसाठी राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली असून गरज असल्यास घराबाहेर पडा असं महानगर पालिकेने ट्विट केले आहे. मुंबईतील लोकल तसेच रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुंबईसहितच पुण्यामध्येही आज जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने नागरिकांना सुरक्षित राहण्यासंदर्भात सुचना केल्या आहे. आपत्कालीन परस्थितीमध्ये जवळच्या पोलिस अथवा अग्निशमन केंद्र अथवा राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) केंद्राशी संपर्क साधा असे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.
पुण्यात सोमवार रात्रीपासूनच जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. आज पहाटेच्या सुमारास आंबेगांव सिंहगड येथील कँम्पसमध्ये सिमाभिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या नऊ जण जखमी झाले असून अग्निशमन दलातर्फे मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. शनिवारी पुण्यातल्या कोंढवा भागात आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यात पुन्हा एकदा दुसरी दुर्घटना घडून त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत ठार झालेले मजूर छत्तीसगढचे रहिवासी आहेत असेही समजते आहे.