देश
हायप्रोफाईल सेक्स रॅकेटनंतर कोकेन रॅकेटप्रकरणी मुंबईतून पाच जणांना अटक
अलिबाग तालुक्यातील किहीम कनकेश्वर परिसरात उघडकीस आलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमधून रायगड पोलिसांना अंमली पदार्थ पुरवणाऱ्या टोळीचा छडा लागला आहे. कोकेन रॅकेटप्रकरणी पोलिसांनी मुंबईतून आणखी पाच जणांना अटक केली आहे. यात दोन नायजेरीयन नागरिकांचा समावेश असून हे कोकेनचे पुरवठादार आहेत. त्यांच्याकडून ५० ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले आहे.
अलिबागमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
जप्त करण्यात आलेल्या ५० ग्रॅम कोकेनची किंमत २ लाख ६५ हजार रूपये इतकी आहे. या पाच जणांसह यापूर्वी पकडण्यात आलेल्या दोन महिला आरोपींना न्यायालयाने ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मागील आठवडयात रायगड पोलिसांनी किहीम परिसरातून मुली पुरवणाऱ्या पाच महिलांसह नऊ जणांना अटक केली होती तर सात मुलींची सुटका केली होती. यावेळी यातील दोन महिलांकडे कोकेन सापडले होते. त्यानुसार पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. अखेर कोकेन पुरवठा करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.