Menu

देश
असाही योगायोग…. ज्या इमारतीचे उद्घाटन केले, तिकडेच बंदिस्त होण्याची वेळ

nobanner

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात बुधवारी रात्री केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर कारवाई केली. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर चिदंबरम हे बेपत्ता झाले होते. यानंतर बुधवारी रात्रीपर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सीबीआयने पी. चिदंबरम यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले.

यावेळी सीबीआय, ईडी आणि दिल्ली पोलिसांच्या पथकातील अधिकारी गेट बंद असल्यामुळे कुंपणाच्या भिंतीवरून उड्या मारून चिदंबरम यांच्या घरात शिरले.

अटक केल्यानंतर पी. चिदंबरम यांना दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयात नेण्यात आले. यावेळी एक योगायोग समोर आला. २०११ मध्ये यूपीए सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री असताना पी. चिदंबरम यांच्याच हस्ते सीबीआयच्या मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, बुधवारी याच वास्तूमध्ये चिदंबरम यांच्यावर बंदिस्त होण्याची वेळ आली.

सीबीआय मुख्यालयाच्या तळमजल्यावर असणाऱ्या क्रमांक पाचच्या खोलीत चिदंबरम यांना रात्रभर ठेवण्यात आले होते. थोड्याचवेळात त्यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. यावेळी सीबीआयकडून चिदंबरम यांची १४ दिवसांची कोठडी मागितली जाऊ शकते. तसेच चिदंबरम यांच्याकडूनही जामिनासाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो.

दरम्यान, चिदंबरम यांच्या अटकेनंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. चिदंबरम यांचे पूत्र कार्ती चिदंबरम यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचे सांगितले. तसेच हा सर्व खटाटोप अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी असल्याचा आरोपही कार्ती चिदंबरम यांनी केला.