देश
आर्थिक संकटाच्या संकेतानंतर शेअर बाजारात पडझड
शेअर बाजारात पडझडीचं सत्र सुरुच आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स पुन्हा साडे तीनशे अंकांनी घसरला. निफ्टीमध्येही घसरण झाली आहे. १०० हून अधिक अंकांनी राष्ट्रीय शेअर बाजार कोसळला. ५ जुलैला अर्थसंकल्प सादर झाल्यापासून बाजारात सुमारे ८ टक्क्यांची घसरण झाली आहे. अर्थव्यवस्थेत आलेली मंदी आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांवर लावण्यात आलेल्या करामुळे पसरलेली नाराजी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय.
त्यात फेडरल रिझर्व्हनं व्याजदर कमी करून अमेरिकेत येऊ घातलेल्या आर्थिक संकटाचं सुतोवाच केल्याची भीती व्यक्त होतेय. त्यामुळे एकूण आर्थिक जगतात खळबळ माजलीय. जवळपास ११ वर्षांनंतर ‘अमेरिकन फेडरल रिझर्व्ह’नं ३१ जुलै रोजी ‘बेंचमार्क इंटरेस्ट रेट’मध्ये २५ पॉईंटसची घट झाल्याचं जाहीर केलंय.
यापुढच्या काळात भारतीय बाजारात घसरणीचा ओघ असाच सुरू राहील असंही सांगितलं जातंय. त्यामुळे थेट शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांनी थोडा वेळ बाजारापासून दूर राहणेच योग्य ठरणार आहे.