दुनिया
ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजाचा खात्मा?; अमेरिकन मीडियाचा दावा
आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ‘अल कायदा’चा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा हामजा बिन लादेन ठार झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकन माध्यमांनी अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. हामजाला ठार करण्यात अमेरिकेला यश आल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले मात्र, याचा तपशील दिला नसल्याचे सीएनएनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. हामजाच्या मृत्यूचे पुरावे नुकतेच अमेरिकन सरकारच्या हाती आल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्तात म्हटले आहे.
यापूर्वी अमेरिकेने हामजाचा पत्ता सांगणाऱ्यास १० लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. अमेरिकेने म्हटले होते की, हामजा आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अमेरिकेवर हल्ल्याच्या तयारीत होता. या पार्श्वभूमीवर त्याची माहिती देणाऱ्यासाठी बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. अमेरिका ओसामाचा मुलगा हामजाला नव्या दहशतवादाच्या रुपात पाहत होती. गेल्या अनेक काळापासून हामजाचा ठावठिकाणा कोणालाही माहिती नव्हता.
काही वर्षांपासून असेही मानले जात होते की, हामजा हा पाकिस्तान, अफगाणिस्तान, सिरीया किंवा इराणमध्ये नजरकैदेत आहे. मात्र, आता त्याच्या मृत्यूचे वृत्त आहे. अमेरिकेच्या हामजाची माहिती देणाऱ्याला बक्षिसाची घोषणा केल्यानंतर सौदी अरेबियाने त्याची नागरिकता रद्द केली होती.