Menu

देश
काँग्रेस म्हणजे दिल्लीच्या गल्लीतील मीना बाजारकाँग्रेस म्हणजे दिल्लीच्या गल्लीतील मीना बाजार

nobanner

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अनेकदा त्यांची मनधारणी करण्याचे अयशस्वी प्रयत्नही काँग्रेसच्या काही नेत्यांकडून करण्यात आले. गेले अडीच महिने काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे अध्यक्षपद रिकामे होते. अखेर दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याच गळ्यात पुन्हा एकदा हंगामी अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. काँग्रेसच्या याच निर्णयावर शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आतापर्यंत ज्या नावांवर चर्चा झाली ती नावे म्हणजे रोगापेक्षा औषध भयंकर अशी अवस्था असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, यावेळी कलम 370 वरूनही शिवसेनेने काँग्रेसला धारेवर धरले. लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा पराभव होऊनही ‘आम्ही देशाचे राज्यकर्ते’ या ‘मोगली’ मानसिकतेतून काँग्रेस पक्ष बाहेर पडायला तयार नाही. देशात कलम 370 हटवल्याचे स्वागत संपूर्ण देशात स्वागत होत असताना काँग्रेस ‘370’ ची जळमटं आपल्या अंगावरून दूर करायला तयार नाही. त्यामुळे काँग्रेसचा दिल्लीच्या गल्लीतील मीना बाजार झाला आहे. त्या ठिकाणी जुनीच गिऱ्हाईके वावरताना दिसतात. तसेच काँग्रेसच्या ऱ्हासाला मोदी शाह जबाबदार नाही. सोनिया गांधी यांच्या खांद्यावर भार टाकून काँग्रेसने उरलेले सत्वही गमावले असल्याचे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?

73वर्षांच्या सोनिया गांधी यांना पुन्हा काँग्रेसची धुरा सांभाळण्यासाठी पुढे यावे लागले. सोनिया गांधी वारंवार आजारी पडतात. उपचारांसाठी त्यांना परदेशात जावे लागते. अधूनमधून त्यांची प्रकृती जास्तच बिघडल्याच्या बातम्या येत असतात. अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेतृत्व करण्याचे ओझे त्यांना वाहावे लागणे हे अमानुष आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन 75 दिवस झाले. काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार नवीन अध्यक्ष निवडा असे राहुल गांधींचे म्हणणे होते. अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरचा असावा असेही त्यांचे सांगणे होते. गांधी कुटुंबाचा पांगुळगाडा त्यागावा व पक्षाने उभारी घ्यावी, असे राहुल गांधी यांनी सांगितले. पक्षाने मनधरणी करूनही ते मागे हटले नाहीत हे महत्त्वाचे. प्रियंका गांधी यांच्या नावाचा धोषा काही मंडळींनी लावताच राहुल गांधी यांनी त्यांना झापले. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप होत आला आहे व त्याबाबत गांधी कुटुंबास जबाबदार धरले जात आहे. त्यातून राहुल गांधी यांनी हा निर्णय घेतला व त्यांच्या निर्णयाचा सन्मान होणे गरजेचे होते, पण 75 दिवसांनंतरही काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष सापडला नाही व 73 वर्षांच्या सोनिया गांधी पुन्हा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा बनल्या आहेत.

काँग्रेस पक्षात सध्या नेतृत्वाची पहिली फळी अस्तित्वात राहिलेली नाही. मोतीलाल व्होरा, अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अँटनी ही ‘फक्त’ भेगा पडलेली फळी आहे. महाराष्ट्राचे सुशीलकुमार शिंदेही त्याच फळीतले आहेत. या फळीच्या आधाराने काँग्रेस पक्ष पुढे जाणे शक्य नाही. तरीही पक्षाध्यक्षपदाचा घोळ 75 दिवस सुरूच राहिला. आताही पक्षाच्या अध्यक्षपदासाठी ज्या नावांवर चर्चा झाली असे म्हणतात, ती नावे म्हणजे ‘रोगापेक्षा औषध भयंकर’ अशी अवस्था म्हणावी लागेल.