Menu

देश
प्रशिक्षकपदासाठी जावेद मियांदाद यांनी सुचवलं ‘हे’ नाव

nobanner

विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये क्रिकेटला इंग्लंडच्या रूपाने नवा विश्वविजेता मिळाला. न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करून त्यांनी सामना जिंकत इतिहास रचला. या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत गारद झाला. तर भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान मात्र सलामीच्या फेरीतच स्पर्धेबाहेर गेला. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाचा प्रशिक्षक बदलण्यात यावा, असा सूर चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. याच दरम्यान, पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनी पाकिस्तानच्या क्रिकेट प्रशिक्षकपदासाठी एक महत्वाचे आणि सुयोग्य नाव सुचवले आहे.

“पाकिस्तानकडे वसीम आक्रमसारखा अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. पूर्ण जगभरात विविध खेळाडू वसीम अक्रम यांच्या मार्गदर्शनाखाली घडत आहेत. त्याने दिलेल्या कानमंत्रामुळे अनेकांनी उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. जर क्रिकेट खेळणारे इतर देश आपल्या माजी खेळाडूचे सहकार्य आणि मार्गदर्शन घेत आपला संघ बलवान करत आहेत, तर आपणच आपल्या माजी खेळाडूचा उपयोग आणि मार्गदर्शन का घेऊ नये? असा सवाल मियांदाद यांनी केला. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले.

“आपल्याकडे मोठ्या स्पर्धांमध्ये जेव्हा खेळाडू चांगली कामगिरी करतात, तेव्हा प्रशिक्षक वर्ग त्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावतो. पण एखाद्या स्पर्धेत खेळाडू अपयशी ठरताना दिसले, तर त्या अपयशाचे खापर खेळाडूंच्या माथी फोडतात. त्यामुळे आपल्याकडे प्रतिभावान माजी खेळाडू असताना परदेशी प्रशिक्षकांना का पसंती द्यायची?, असेही त्यांनी विचारले. जावेद मियांदाद यांनी स्वतः पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षकपद १९९८-९९ च्या भारत दौऱ्याच्या वेळी भूषवले होते. त्यावेळी वसीम अक्रम संघाचे नेतृत्व करत होता.