देश
लवकरच देशात धावणार पहिली अंडरवॉटर ट्रेन
आता लवकरच देशात नागरिकांना पाण्याखाली धावणाऱ्या ट्रेनचा अनुभव घेता येणार आहे. कोलकात्यातील हुगळी नदीखालून ही ट्रेन धावणार आहे. रेल्वे लाईन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. त्यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओही शेअर केला आहे.
देशातील पहिली पाण्याखालून धावणारी ट्रेन सॉल्टलेक सेक्टर 5 ते हावडा मैदानापर्यंत धावण्यासाठी जवळपास तयार असल्याचे या व्हिडीओमधून सांगण्यात आले. तसेच हा रेल्वेमार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्यातील पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला केला जाणार असल्याचे यात सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कोलकात्यातील प्रवाशांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. या ट्रेनला पाण्यापासून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा कवच लावण्यात आले आहे. तसेच नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब आणि 30 मीटर खोल आहे. नदीखालून ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे. ही ट्रेन लवकरच सुरू होणार असून हे उत्तम इंजिनिअरिंगचं प्रतिक असल्याचं पीयूष गोयल म्हणाले. ही देशासाठी अभिमानास्पद बाब असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जगातील 5 लांब अंडरवॉटर टनल
सिकन टनल- 53.9 किमी
चॅनल टनल- 37.9 किमी
टोक्यो बे एक्वा लाईन- 15 किमी
बोमलाफ्योड टनल- 7.8 किमी
इकसुंड टनल- 7.7 किमी