Menu

देश
सीएसएमटी-कसारा मार्गावरील लोकल सुरू; प्रवाशांना दिलासा

nobanner

काल झालेल्या मुसळधार पावसामुळं ठप्प झालेली सीएसएमटी ते कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक सकाळपासून धीम्या गतीनं सुरू झाली आहे. तर, सीएसएमटी-कर्जत मार्गावरील वाहतूक अंबरनाथपर्यंत सुरू झाली आहे. कालपासून रखडलेल्या एक्स्प्रेस गाड्याही सुरू झाल्या आहेत. त्यामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई, ठाणे जिल्ह्यात रविवारी धुमशान घालणाऱ्या पावसानं रात्रीपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळं रेल्वे प्रशासनाला दुरुस्तीसाठी उसंत मिळाली आहे. मध्य रेल्वेची कर्जत व कसारा मार्गावरील वाहतूक हळूहळू ट्रॅकवर येत आहे. कल्याण-कर्जत दरम्यानची सिग्नल यंत्रणा वाहून गेल्यामुळं या मार्गावरील वाहतूक दोन दिवस बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, प्रवाशांना सुखद धक्का बसला आहे. कल्याण ते अंबरनाथ लोकल सकाळपासूनच धावू लागल्याचं समजतं. गाड्या नियमित आणि वेळापत्रकानुसार नसल्या तरी वाहतूक सुरू झाल्यानं प्रवाशांनी मध्य रेल्वेचे आभार मानले आहेत.