पेहलू खान हत्या प्रकरणात अल्वरच्या स्थानिक न्यायालयाने बुधवारी सर्वच्या सर्व सहा आरोपींची निर्दोष सुटका केली. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सरीता स्वामी यांनी पेहलू खान हत्या प्रकरणात निकाल दिला. जमावाने केलेल्या मारहाणीत पेहलू खान यांचा मृत्यू झाला होता. सहा आरोपींवर पेहलू खान यांना मरेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप होता.
सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची सुटका झाली. एक एप्रिल २०१७ रोजी गायींची वाहतूक करत असताना पेहलू खान आणि त्याच्या दोन मुलांना जमावाने मारहाण केली होती. पेहलू खान यांचा दोन दिवसांनी उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला होता. पेहलू खान त्यांची दोन मुले आणि अन्य काही जण गायींची वाहतूक करत असताना कथित गोरक्षकांनी बेहरोरजवळ त्यांचा ट्रक रोखला व बेदम मारहाण केली.
पेहलू खान यांचा चार एप्रिलला रुग्णालयात मृत्यू झाला. पेहलू खान एका छोटया ट्रकमधून गायी घेऊन राजस्थान जयपूरहून त्यांच्या मूळगावी हरयाणातील जयसिंहपुरा येथे चालले होते. बेहरोर पोलीस ठाण्यात या प्रकरणी सात एफआयआर नोंदवण्यात आले. त्यात एक एफआयआर पेहलू खान यांच्या हत्ये प्रकरणी होता तर अन्य सहा गायींच्या बेकायदा वाहतूक करण्यासंबंधी होते.
या गुन्ह्यामध्ये एकूण सहा वाहने वापरण्यात आली. खान यांच्या हत्या प्रकरणात सुनावणी पूर्ण करुन न्यायालयाने निकाल दिला. अन्य सहा प्रकरणांचा तपास सुरु आहे. या प्रकरणात ४७ साक्षीदारांच्या जबानी नोंदवण्यात आल्या. यात पेहलू खानच्या दोन मुलांचीही साक्ष होती. सर्व आरोपी जामिनावर बाहेरच होते.