Menu

देश

nobanner

बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने कामगारांच्या वेतन कराराच्या मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले. बेस्ट प्रशासन आणि कृती समितीतील चर्चेची फेरी निष्फळ ठरल्यानंतर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संपाची भूमिका घ्यावी लागेल, असे कृती समितीने स्पष्ट केले. संपात पदाधिकारी सहभागी होणार असले तरी चालक-वाहकांसह कर्मचारी सहभागी झाल्यास बेस्ट सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

बेस्ट कामगारांचा २०१६ ते २०२१ पर्यंतचा वेतनकरार व अन्य मागण्या प्रलंबित असून त्यावर गेल्या काही महिन्यांपासून तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संप करावा की नाही यासाठी निवडणूक घेऊन कामगारांची मते जाणून घेतली व संपाचा कौल देण्यात आला होता. बेस्ट प्रशासनासोबत मंगळवारीही बैठक होती. मात्र या बैठकीत तोडगा निघाला नाही आणि मंगळवारपासून संप होण्याची शक्यता होती. परंतु संपाऐवजी सध्या कृती समितीने बेमुदत उपोषण पुकारल्याचे समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले. संपात उपोषण सुरूच राहणार असून तोडगा निघाला नाही तर संपाची भूमिका घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेकडून संप फोडण्याचाही प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. उपोषणात चालक-वाहकांसह ज्या कर्मचाऱ्याची रजा असेल तो सहभागी होऊ शकतो. यासाठी कुणावरही जबरदस्ती केली नसल्याचे राव म्हणाले.

वेतनाचा प्रश्न मार्गी?

मंगळवारी दुपारी १२ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बेस्ट कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने ‘मातोश्री’वर भेट घेतली. त्यात कामगारांच्या वेतनवाढीसह अन्य मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना वेतन कराराची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दुपारी चार वाजता महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, बेस्ट महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, आदी सहभागी होते. त्यावेळी, बेस्ट कामगारांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागल्याचा दावा बेस्ट कामगार सेनेने केला आहे.