देश
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन हर्षवर्धन पाटील यांचा भाजपात प्रवेश
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसबाबत नाराजी व्यक्त केलीच होती. ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. अखेर आज काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. ते इंदापूर मतदार संघातूनच भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार का? हा प्रश्न कायम आहे. मात्र आज त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच एक मेळावा घेऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसंच त्याच मेळाव्यात त्यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे. हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसच्या कार्यकाळात मंत्री होते. मात्र त्यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन पाटील आधी भाजपात आले असते तर एव्हाना खासदार झाले असते असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
निष्ठेने वागायचं असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी मोदी सरकारच्या धाडसी निर्णयांचं कौतुकही केलं आहे. “मी कोणतीही अट घालून भाजपात आलेलो नाही” असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच “पक्ष देईल ती जबाबदारी मी सांभाळायला तयार आहे” असंही त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभर दिवसात अनेक धाडसी निर्णय घेतले यात काहीही शंका नाही.
“हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा अनुभवी नेता भाजपात आल्याने भाजपाचं बळ वाढेल” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर, “पाच वर्षांपासून हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची वाट बघत होतो. संसदीय कार्यमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी प्रदीर्घ काळ काम केलं. सर्वांना सोबत घेण्याची हातोटी त्यांच्याजवळ आहे त्याचा उपयोग आम्हाला निश्चितपणे होईल. त्यांच्या गाठीशी जो अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा भाजपाला आणि युती सरकारला मिळेल ” असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.