Menu

देश
गणेश विसर्जनावेळी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

nobanner

भोपाळच्या खटलापूर घाट येथे शुक्रवारी पहाटे गणपती विसर्जनादरम्यान बोट उलटून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांना वाचवण्यात यश आले.

पहाटे साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. येथील पिपलानी परिसरातील सार्वजनिक मंडळाचा गणपती विसर्जनासाठी खटलापूर घाट येथील तलावावर आणण्यात आला होता. यावेळी मूर्तीचे क्रेनच्या सहाय्याने विसर्जन करण्यात आले. मात्र, यावेळी मंडळाचे काही कार्यकर्ते विसर्जन सोहळा पाहण्यासाठी बोटीने तलावात आतपर्यंत गेले होते. मूर्तीचे विसर्जन सुरु असताना बोट अचानकपणे उलटली आणि सर्वजण तलावात पडले.

यापैकी पाच जण पोहत तलावाच्या काठावर पोहोचले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, होमगार्ड आणि एनडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरु केले. मात्र, तोपर्यंत ११ जणांना जलसमाधी मिळाली होती. या सर्वांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले आहेत.

या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातही गणेश विसर्जनावेळी झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये २३ भाविकांना जलसमाधी मिळाली. यापैकी अमरावतीमध्ये चार, नाशिकमध्ये तीन, राजापूरात तीन, तारकर्ली, नगर, नागपूरमध्ये प्रत्येकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. याशिवाय, वाशिम, बुलढाणा, नांदेड, शहापूर, कराड, वर्धा, भंडाऱ्यातील दुर्घटनेतील गणेशभक्तांचा मृत्यू झाला.