खेल
“जरा डोकं वापर ना…”; मैदानावरच दिसला रोहितचा रूद्रावतार
दक्षिण आफ्रिकेने कर्णधार क्विंटन डी-कॉकने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर अखेरच्या टी २० सामन्यात भारतावर ९ गडी राखून मात केली. भारताने विजयासाठी दिलेले १३५ धावांचे माफक आव्हान आफ्रिकेने सहज पूर्ण केले. त्यात डी कॉकने नाबाद ७९ धावा केल्या आणि १७ व्या षटकातच आफ्रिकेला विजय मिळवून दिला. या विजयासह तीन टी २० सामन्यांची ही मालिका १-१ अशा बरोबरीत सुटली.
तिसऱ्या सामन्यात डी कॉक आणि बावुमा या दोघांनी भारताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मध्यमगतीने टाकलेले चेंडू अधिक लाभदायक ठरत असताना भारताचा नवदीप सैनी वेगवान गोलंदाजी करत होता आणि परिणामी त्याला चांगलाच मार पडत होता. त्यावेळी रोहित शर्माचा मैदानावरच रूद्रावतार पाहायला मिळाला. सैनीने ताशी १४८ किमीच्या वेगाने गोलंदाजी बावुमाला यॉर्कर चेंडू टाकला, पण दुर्देवाने तो टप्पा पडण्याआधीच बावुमाने टोलवला आणि चौकार मिळवला. त्यानंतर वैतागलेल्या रोहितने सैनीकडे पाहत ‘जरा डोकं वापर’ असा इशारा केला. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना डी-कॉक आणि हेंड्रिग्ज यांनी आफ्रिकेला दणक्यात सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला. हेंड्रिग्ज २८ धावांवर हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पण डी कॉकने बावुमाच्या साथीने आफ्रिकेला विजय मिळवून दिला.
त्याआधी, भारतीय फलंदाज बंगळुरुच्या मैदानात पुरते अपयशी ठरले. ब्युरेन हेंड्रिग्ज, बिजॉर्न फोर्टेन यांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताला १३४ धावांवर रोखण्यात आफ्रिकेने यश मिळवले. सलामीवीर रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या आणि ऋषभ पंत कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही. रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी केली त्यामुळे भारताला १३४ धावांचा टप्पा गाठता आला.