देश
‘निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी’
दहा दिवस आपल्या लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. आज (गुरूवारी) दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. बाप्पाचे विसर्जन निर्विघ्न व्हावे यासाठी पोलीस प्रशासनासह मुंबई महानगरपालिकाही सज्ज झाली आहे. मुंबईतील 129 ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे. तसंच मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 32 ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.
पोलीस आणि महानगरपालिकेच्या जोडीला काही खासगी संस्थाही मदतीसाठी सज्ज झाल्या आहेत. तसंच पालिकेच्यावतीने धोकादायक ब्रीजवरून गणपती विसर्जनाच्या मिरवणुका न काढण्याच्या विशेष सुचना दिल्या आहेत. दरम्यान, गणपती विसर्जन सुरळीत व्हावं यासाठी 50 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसंच पोलीसांसह एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी, फोर्स वन, रॅपिड अॅक्शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहे.
दरम्यान, 5 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रत्येक ठिकाणांवर नजर ठेवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त सुरक्षेसाठी काही पोलीस साध्या वेशातही तैनात करण्यात आले आहेत. तसंच विसर्जनादरम्यान आपल्या पाल्यांवर विशेष लक्ष देण्याचे आवाहान प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईतील 53 रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. तसंच वाहतुककोडी होऊ नये, विसर्जन मिरवणूक आणि वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईतील मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त 99 ठिकाणी पार्किंगही बंद करण्यात आली आहे.
विसर्जनादरम्यान होणारी गर्दी पाहता मेडिकल सेंटर्स, वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत. तसंच हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठीही एक विशेष सेंटर सुरू करण्यात आले आहे. सुरक्षेसाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदतही घेण्यात येणार आहे. विसर्जन करताना खोल पाण्यात न जाण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मदतीसाठी संपर्क क्रमांक
विर्सजन मिरवणुकीत कोणतीही अत्यावश्यक सेवा किंवा मदत हवी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. भाविकांना पोलीस नियंत्रण कक्षाबरोबरच ट्विटर आणि एसएमएसद्वारे ७७३८१३३१३३, ७७३८१४४१४४ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
पुढील वर्षी बाप्पा लवकर येणार
आज जड अंत:करणाने बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. परंतु दुसरी एक आनंदाची बाब म्हणजे लाडका बाप्पा पुढील वर्षी 11 दिवस लवकर येणार आहे. पुढील वर्षी शनिवार 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी येणार आहे