Menu

देश
पाकिस्तान नरमला; कुलभूषण जाधव यांना आज मिळणार दूतावासाची मदत

nobanner

भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचे कथित आरोप करणाऱ्या पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुलभूषण जाधव यांना दूतावासाची मदत देण्यास पाकिस्तानने होकार दिला आहे. सोमवारी (२ सप्टेंबर) भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना जाधव यांना भेटू दिले जाणार असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी कुलभूषण जाधव यांना दूतावासाची मदत देणार असल्याची माहिती ट्विटवरून दिली. “भारतीय नौदलातील अधिकारी कुलभूषण जाधव यांना २ सप्टेंबर रोजी भारतीय दूतावासाची मदत दिली जाणार आहे. व्हिएन्ना करार, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश आणि पाकिस्तानी कायद्यानुसार ही मदत देण्यात येत आहे. कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या कैदेत आहेत”, असे फैसल यांनी म्हटले आहे.

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ ए हटवल्यांपासून पाकिस्तानने दुसऱ्यांदा जाधव यांच्या मदतीचा प्रस्ताव दिला आहे. यापूर्वी पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांना कुलभूषण जाधव यांची भेट घेण्याची परवानगी दिली होती. मात्र त्यावेळी अनेक अटी पाकिस्तानने टाकल्या होत्या. जाधव आणि भारतीय अधिकाऱ्यांच्या भेटीवेळी पाकिस्तानी अधिकारी हजर राहिल, भेटीच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येतील तसेच जाधव आणि अधिकाऱ्यांमध्ये होणारी चर्चा रेकॉर्ड करण्यात येईल आदी अटी पाकिस्तानने लादण्याचा प्रयत्न केला होता. “आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कोणत्याही अटी न ठेवता खुल्या वातावरणात दूतावासाच्या अधिकाऱ्यांना भेटू द्यावे”, असे सांगत भारताने पाकिस्तानचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यानंतर आता नव्याने दूतावासाच्या मदतीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करून निर्णय घेणार असल्याचे ‘इंडियन एक्स्प्रेस’ने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

तथाकथित हेरगिरी आणि दहशतवाद पसरवण्याच्या आरोपांवरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात भारताने थेट नेदरलँडमधील द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. “जाधव यांच्या प्रकरणाचा आणि दिलेल्या शिक्षेचा आढावा घेऊन फेरविचार करण्यात यावा. तसेच विलंब न करता त्यांना भारतीय दूतावासाची मदत देण्यात यावी”, असे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले होते.