देश
बघा, प्रचार न करता नेहरूंसाठी कशी गर्दी लोटली होती; शशी थरूरांनी दाखवला अमेरिकेतील फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ह्युस्टनमधील हाउडी मोदी कार्यक्रमावरून अनुकूल व प्रतिकूल अशा दोन्ही प्रतिक्रियांची लाट आली आहे. विरोधकांचा मुख्य रोष मोदींच्या धोरणांवर होता. मात्र, काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी मोदींना लाभलेली गर्दी ही पब्लिसिटी, मार्केटिंग आदींचा मेळ असल्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. थरूर यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांचा अमेरिकेतील फोटो ट्विट केला असून बघा ही उत्स्फूर्त गर्दी असं म्हटलं आहे. विशेष म्हणज त्यांनी इंदिरा गांधींचं नाव ‘इंडिया’ गांधी असं नमूद केलं असून त्या मोदींपेक्षा लोकप्रिय होत्या असंही सूचित केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. तर शेहला रशीदनं मोदींना काश्मीरी तसेच खलिस्तानवादी निदर्शनांच्या माध्यमातून विरोध करत असल्याची ट्विटची मालिका केली होती. आता पाठोपाठ काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा अमेरिकेच्या दौऱ्यातील एक फोटो शेअर केला आहे. “बघा, कोणताही प्रचार न करता पंडित नेहरू आणि इंडिया गांधी यांना बघण्यासाठी अमेरिकन नागरिकांनी कशी गर्दी केली होती,” असं थरूर यांनी म्हटलं आहे.
ह्युस्टनमधील हाउडी मोदी कार्यक्रमात ५० हजार अनिवासी भारतीयांना संबोधित केले. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही उपस्थिती होती. याच कार्यक्रमात मोदी यांनी फिर एक बार ट्रम्प सरकारचा नारा दिला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्यावर बरीच टीका होत आहे. थरूर यांनी शेअर केलेला फोटो १९५४ सालीचा आहे. या फोटोबरोबरच शशी थरूर यांनी आपले मतही मांडले आहे.
थरूर म्हणाले, “नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे १९५४ मधील हे छायाचित्र आहे. बघा, कोणताही प्रचार न करता, अनिवासी भारतीयांच्या गर्दीचं व्यवस्थापन न करता किंवा माध्यमातून प्रचार न करता किती उत्साहाने अमेरिकन नागरिक नेहरूंच्या स्वागतासाठी आली होती,” असं थरूर यांनी सांगितलं आहे.