देश
लालबागचा राजा मंडळाला सहा वर्षांमध्ये 60 लाखांचा दंड
मुंबई महानगरपालिकेने लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला गेल्या सहा वर्षांमध्ये 60 लाखांचा दंड ठोठावला आहे. रस्त्यांवर करण्यात येणाऱ्या सजावटीसाठी खणण्यात आलेले खड्डे न भरल्यामुळे पालिकेने मंडळावर दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.
स्थानिक माहिती अधिकार कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी याबाबत माहिती दिली. मंडळाने 2018 मध्ये एकूण 953 खड्डे केले होते. तसंच दरवर्षी एवढेच खड्डे खणण्यात येतात. परंतु हे खड्डे पुन्हा भरण्यात येत नाहीत. सध्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने हा दंड भरला नाही, असं वेंगुर्लेकर यांनी सांगितलं. डीएनएने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या नियमांनुसार प्रति खड्डा 2000 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, आतापर्यंतची संपूर्ण रक्कम भरली असल्याचे लालबागचा राजा मंडळाकडून सांगण्यात आलं. परंतु मुंबई महानगरपालिकेने मंडळाचा दावा नाकारला आहे. तसंच मंडळानं दंडाची रक्कम न भरल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एफ साऊथच्या एका अधिकाऱ्याने दिली.
“पालिकेने आमच्यावर पारलकर मार्ग आणि केईएम रूग्णालयाजवळ खणण्यात आलेल्या खड्ड्यांबाबत दंड ठोठावला आहे. परंतु आम्ही याला आव्हान दिलं असून यासंदर्भात एक पत्रही पाठवलं आहे. मंडळावर ठोठावण्यात आलेला दंड भरण्यात आला असून बिल दाखवून आम्ही ते सिद्ध करू शकतो,” अशी माहिती मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी दिली.