देश
वडील आपल्या मुलीशी करु शकतात लग्न, ‘या’ देशाच्या संसदेत विधेयक मंजूर
इराणच्या संसदेत एक असं विधेयक मंजूर झालं आहे ज्यावरुन आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या विधेयकानुसार वडील दत्तक घेतलेल्या आपल्याच मुलीसोबत लग्न करु शकतात. विधेयकानुसार, दत्तक घेतलेल्या मुलीचं वय १३ पेक्षा जास्त असल्यास तिच्या वडिलांना लग्नासाठी परवानगी देण्यात आली आहे. इराणमध्ये २२ सप्टेंबर रोजी हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. दरम्यान या विधेयकावरुन एकीकडे दुसरे देश आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर इराणमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.
इराणच्या सुरक्षा परिषदेकडून अद्याप या विधेयकावर निर्णय दिलेला नाही. लंडन स्थित ग्रुप जस्टीस ऑफ इराणच्या मानवाधिकार वकील शदी सदर यांनी द गार्डियनशी बोलताना सांगितलं आहे की, “हे विधेयक म्हणजे लहान मुलांच्या लैंगिक शोषणाला कायदेशीर करण्याचा प्रकार आहे. आपण दत्तक घेतलेल्या मुलीशी लग्न करणं इराणच्या संस्कृतीचा भाग नाही. इराणमध्ये इतर देशांप्रमाणे अनेक अनैतिक गोष्टी आहेत, पण हे विधेयक इराणमधील मुलांसंबंधी गुन्हेगारीला खतपाणी घालण्यासारखं आहे. जर दत्तक घेतलेल्या आपल्याच मुलीसोबत वडील शारीरिक संबंध ठेवत असेल तर हा बलात्कार आहे”.
सदर यांच्या म्हणण्यानुसार, इराणमधील काही अधिकारी हिजाबच्या समस्येच्या नावाखाली विधेयकातील वादग्रस्त मुद्द्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. दत्तक घेतलेल्या मुलीला वडिलांसमोर हिजाब घालावा लागतो, तर दत्तक घेतलेल्या मुलासमोर आईने हिजाब घेणं अनिवार्य आहे. पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “काही तज्ञांच्या मते हे नवं विधेयक इस्लामच्या विचारसरणीच्या विरोधात आहे. आणि सुरक्षा परिषद त्याला मान्यता देणार नाही”.
इराणमधील लहान मुलांच्या अधिकाऱ्यांसाठी लढणाऱ्या संस्थेच्या प्रमुख शिवा डोलाताबादी यांनी या विधेयकासंबंध बोलताना यामुळे लहान मुलांसंबंधीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होईल अशी भीती व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांना त्यांच्या कुटुंबातही सुरक्षित असल्याची भावना वाटणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
इस्लामिक देशांमध्ये १३ वर्षांच्या वरील मुली वडिलांच्या संमतीने लग्न करु शकतात. तर मुलांसाठी ही वयाची अट १५ आहे. मुलीचं वय १३ पेक्षा कमी असल्यास तिच्या लग्नासाठी न्यायाधीशांची संमती मिळवणं जरुरी आहे. २०१० पासून इराणमध्ये १० ते १४ वर्षांत जवळपास ४२ हजार मुलांची लग्नं झाली आहेत. इराणची वेबसाईट तबनकनुसार, फक्त तेहरानमध्ये १० वर्षापेक्षा कमी वयाच्या ७५ मुलांची लग्न झाली आहेत.