देश
सुप्रिया सुळे यांच्याशी असभ्य वर्तन, टॅक्सी ड्रायव्हरला अटक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत दादर स्थानकावर असभ्य वर्तन झाल्याचा प्रकार समोर आला होता. या संदर्भात त्यांनी दादर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. टॅक्सी ड्रायव्हर आणि एजंट कुलजित सिंह मल्होत्रा याने सुप्रिया सुळे यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केले, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. याची पोलिसांनी दखल घेत त्याला अटक केली आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टॅक्सीचालकाच्या मुजोरीचा, अरेरावीचा सामना करावा लागला होता. याबाबत सुळे यांनी ट्विट करत टॅक्सी चालकाच्या गैरवर्तणुकीची तक्रार थेट रेल्वे मंत्र्यांकडेच केली. सुप्रिया सुळे यांच्या तक्रारीनंतर टॅक्सी चालक कुलजीतसिंह मलहोत्रा याला अटक करण्यात आली आहे.
सुप्रिया सुळे या आज सकाळी औरंगाबाद आणि मराठवाडा दौरा करुन देवगिरी एक्स्प्रेसने दादरला पोहोचल्या. देवगिरी एक्स्प्रेस ही दादरला ३ मिनिटे थांबते म्हणून त्यांच्याकडे उतरण्यासाठी खूप कमी वेळ होता. तितक्यात टॅक्सी एजंट कुलजित सिंह मल्होत्रा हा त्यांना डब्याजवळ येऊन टॅक्सी टॅक्सी, असे विचारू लागला. सुप्रिया सुळे यांनी त्याला टॅक्सी नको असल्याचे सांगितले. तसेच समोर असलेल्या कुलीला बॅग घेण्यासाठी विनंती केली. तरीही कुलजित सिंह हा जवळ येत टॅक्सी टॅक्सी, असे ओरडत होता. त्याला नको असे सांगितल्यावरही तो कानाजवळ येऊन ओरडत होता, असे सुप्रिया सुळे यांनी ‘झी २४ तास’ला सांगितले.
रोज कुठल्या ना कुठल्या कारणाने महिलांना असा त्रास होतो. त्यामुळे मी लिखित स्वरूपात ही तक्रार केल्याचे सुप्रिया सुळे म्हणाले. प्रशासनाने यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर या मजोर टॅक्सीचालकाला पोलिसांनी अटक केली.