देश
अजित पवार यांचा फोन हॅक
निवडणुकांत काळ्या पैशांचे मोठे व्यवहार होत असतात. उमेदवारी मिळवण्यासाठीचे बहुतेक व्यवहार हवालाने होतात. त्यात अनेकांची फसवणूक झाल्याचे बोलले जाते. असाच किस्सा चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासंदर्भात उघडकीस आला आहे.
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विश्वस्त नरेंद्र राणे यांना रविवारी सकाळी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नंबरवरून फोन आला. त्या फोनवर कुणाल नावाची व्यक्ती बोलत होती. ‘सध्या दादा पुण्यात आहेत. मात्र एका व्यक्तीला मुंबईत तातडीने मोठी रक्कम अदा करायची आहे. तुम्ही या बँक खात्यावर इतकी इतकी रक्कम तत्काळ भरण्याची व्यवस्था करा,’ असा निरोप होता.
राणे यांनी लगेच होकार कळवला आणि पैशाची व्यवस्था करण्यासाठी १० मिनिटे वेळ मागितला. राणे यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अजित पवार यांचा असा फोन कधीच येऊ शकत नाही, असा त्यांचा अंदाज होता. त्यांनी अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांना फोन लावला तेव्हा अजित पवार पुण्यात असल्याचे कळले. राणे यांनी अर्ध्या तासाने अजित पवार यांना फोन लावला, काही वेळातच पैशाची व्यवस्था करतो, असे सांगितले. मात्र अजित पवार यांनी ‘मी तुम्हाला फोन केलेलाच नाही, माझा फोन माझ्याकडे आहे. कोणत्या पैशाचे बोलता,’ असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला.
त्यानंतर सर्व उलगडा झाला. पवार यांचा फोन हॅक झाल्याचे समजले. त्यानंतर राणे यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइमकडे यासंदर्भात तक्रार दिली असून फोनचे सर्व कॉल डिटेल्स दिले आहेत, असे समजते.