Menu

देश
अमेरिकेत पार पडला पारंपरिक भोंडला

nobanner

लहानपणी परकर-पोलका घालून छम… छम… तोरड्या वाजवीत फेर धरून गायलेल्या भोंडल्याच्या गाण्याचे स्वर अमेरिकेतील मिनीयापोलिसमधील आपल्या घरात गुंजावेत असे स्वप्न मृण्मयी गेल्या दोन-तीन वर्षापासून पाहत होत्या. अर्थात, त्यावेळी त्यांना कल्पना नव्हती की, जेव्हा प्रत्यक्षात भोंडल्याचा फेर धरला जाईल, तेव्हा अमेरिका आणि भारतातदेखील त्याची इतकी चर्चा होईल. भोंडला नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. इतर सणांप्रमाणे भोंडलाही निसर्गाशी जोडलेला आहे. हस्तनक्षत्राचा धो! धो! पाऊस झाल्यानंतर येणाऱ्या जोमदार पिकांसाठी निसर्गाचे, देवाचे आभार भोंडल्याच्या माध्यमातून मानले जातात. भोंडल्याच्या अनेक गाण्यांमध्येही याचे वर्णन आहे.

मृण्मयी आणि शीतल कुलकर्णी यांच्या कल्पनेतून अमेरिकेत पार पडलेल्या भोंडल्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे दरवर्षी भोंडल्याचे आयोजन करण्याचे त्यांनी ठरवले आहे. भोंडल्याच्या ठिकाणी सजावटीसाठी पेशवेकालीन वाडा आणि मराठी कुटुंबाच्या प्रतिकात्मक घराची सजावट करण्यात आली होती. अगदी उंबरठ्यापासून वाड्याच्या दिंडी दरवाज्यापर्यंत, तांब्या-पितळ्याच्या भांड्यांनी चकाकणारे स्वयंपाकघर, केळ्याच्या पानावरील पंगत, तुळशी वृंदावन, बसण्याच्या बैठकीपर्यंत सारा जामानामा करण्यात आला होता. मायदेशापासून दूर अमेरिकेत सजावटीचे साहित्य गोळा करणे तसे खूपच आव्हानात्मक होते. परंतु देघींनी यशस्वीपणे ते पार पाडले. यावेळी पूजा नावाची मैत्रीण त्यांच्या मदतीसाठी धावून आली.

कोजागरी पौर्णिमेच्या रात्री बोचर्‍या थंडीत आणि बर्फाच्या पहिल्या शिडकाव्यात मृण्मयीच्या घराचे तळघर पेशवाई थाटातील सजावटीने सज्ज करण्यात आले होते. रंगीबेरंगी नऊवारी साड्या, पारंपारिक दागिने घालून आलेल्या मैत्रिणींच्या हास्य-गप्पांनी आणि परकर-पोलका घालून मुरडणाऱ्या लहान मुलींनी मृण्मयीचे घर गजबजून गेले. अगदी अमराठी मैत्रिणीही तितक्याच उत्साहाने तयार होऊन आल्या होत्या. तळघराच्या पायऱ्या उतरून उंबरठा ओलांडल्यावर आपण पेशवेकालीन वाड्यातच प्रवेश करत आहोत असे वाटावे झतकी छान सजावट करण्यात आली होती. हळद-कुंकू, गुलाब पाण्याचा शिडकावा करून भोंडल्याला आलेल्यांचे प्रवेशद्वारातच स्वागत करण्यात आले. सुंदर सजवलेल्या हत्ती भोवती फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणण्यात आली. काही पारंपारिक तर काही नवीन मजेदार गाणी खसखस पिकवून गेली. भोंडला झाल्यावर खिरापतीचा कार्यक्रम पार पडला. दडपे पोहे, गोपाळकाला, भजी, वड्या, मसाला दूध, केकपासून वडापावपर्यंतच्या पदार्थांचा आस्वाद सगळ्यांनी घेतला. गंमतीशीर उखाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.

यावेळी वाटप करण्यात आलेल्या पारितोषिकांमध्ये शीतल यांना सर्वोत्कृष्ट पोशाख तर शिल्पा सुवर्णपत्की यांना सर्वोत्कृष्ट केशरचनाचे पारितोषिक देण्यात आले.