देश
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
कल्याण पश्चिमेतील मोहने भागात एका तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी तरुणाविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण शेंडगे असे त्याचे नाव असून त्याने यापूर्वी चार वेळा असा प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी दिली.
मोहने येथील एनआरसी कॉलनीमध्ये किरण वडापाव विक्रीचा व्यवसाय करतो. किरणने हा प्रकार केल्याचे समजातच परिसरातील संतप्त रहिवाशांनी त्याच्या हातगाडीची मोडतोड केली. मुलींचा विनयभंग करायची त्याला सवय लागली होती. पालक त्याच्या घरी जाब विचारण्यास गेले की, त्याचे पालक जाब विचारणाऱ्या पालक, मुलीला धमकावत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. किरण शेंडगे हा वंचित बहुजन आघाडीचा या भागाचा पदाधिकारी म्हणून काम पाहत होता, असेही रहिवाशांचे म्हणणे आहे. पोलिसांनी मात्र, याला अधिकृत दुजोरा दिला नाही.