देश
काँग्रेस आघाडीला आणखी एक धक्का, दलित महासंघाचा भाजपा मित्रपक्षांना पाठिंबा
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासह आपल्या पाच मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मकता दर्शवल्याने दलित महासंघ भाजप व त्यांच्या मित्रपक्षांच्या उमेदवारांना साथ देणार आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून राज्यभर प्रचार दौरे करणार असल्याची घोषणा दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी केली. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत प्रा. सकटे यांनी भूमिका स्पष्ट केली.
प्रा. सकटे म्हणाले, की दलित महासंघ २७ वर्षे राज्यात व राज्याबाहेर सामाजिक कार्य करीत आहे. शरद पवार यांच्यामुळे दलित महासंघाने सन १९९९ मध्ये पहिल्यांदाच राजकीय भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला पाठबळ दिले. पवारांनी अण्णा भाऊ साठे अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊन आपला, आपल्या चळवळीचा तसेच मातंग समाजाचा सन्मान केला होता. असे असताना सन २००२ पासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला नीट वागणूक दिली नाही. कार्यकर्त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसंदर्भात वाईट अनुभव आले. त्यामुळे संघटनेत स्वाभाविकपणे नाराजी होती. या पाश्र्वभूमीवर अलीकडेच झालेल्या महासंघाच्या बैठकीत बहुसंख्य कार्यकर्त्यांनी वाट्टेल ते झाले तरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य करायचे नाही अशी ताठर भूमिका घेतली होती आणि म्हणूनच कार्यकर्त्यांच्या भावनेची कदर व आदर करून आम्ही भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रा. सकटे यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केल्यावर उभय नेत्यांनी आमच्या मागण्या व महासंघाबरोबरच मातंग समाजालाही सहकार्याची हमी दिल्याने भाजप व त्यांच्या मित्रपक्षांच्या सर्व उमेदवारांना पाठबळ देण्याची भूमिका घेतली आहे. शेखर चरेगावकर यांनी दलित महासंघाच्या भाजपसोबत येण्याच्या भूमिकेचे स्वागत करून म्हंटले, काँग्रेसवाल्यांचा केवळ दिखाऊपणा लक्षात आल्यानेच दलित महासंघ भाजपसोबत आला असून, त्यांचा हा निर्णय महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय वाटचालीत अत्यंत महत्त्वाचा ठरेल.