देश
पीएमसी बॅँक खातेदारांचा ठाण्यात मोर्चा
पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेवर रिझव्र्ह बँकेने आर्थिक र्निबध घातल्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या बँकेच्या खातेदारांनी रविवारी घोडबंदर परिसरात मूकमोर्चा काढून बँकेच्या संचालकांसह सरकारचा निषेध नोंदविला. तसेच खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत, तर विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’ या पर्यायाचा वापर करण्याचा इशाराही मोर्चेकऱ्यांनी या वेळी दिला.
पीएमसी बँकेत पैसे अडकल्यामुळे खातेदार हवालदील झाले आहेत. आपले पैसे परत मिळावे, यासाठी खातेदारांकडून आंदोलने केली जात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी ठाण्यात प्रचारसभा पार पडली. या सभेनंतर बँकेच्या खातेदारांनी त्यांना घेराव घालून या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली. असे असतानाच रविवारी सकाळी घोडबंदर येथील ब्रह्मांड परिसरात बँकेच्या खातेदारांनी मूकमोर्चा काढून बँकेच्या संचालकांसह सरकारचा निषेध नोंदविला.
या घोटाळ्याला जितके पीएमसी बँकेचे अधिकारी जबाबदार आहेत, तितकेच या बँकेला ‘अ’ दर्जा देणारे लेखा परीक्षकही जबाबदार आहेत. त्यामुळे रिझव्र्ह बँकेने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
बँकेत पैसे अडकल्यामुळे अनेकांची आर्थिक कोंडी झाली असून, अनेक खातेदारांनी या मोर्चा दरम्यान आपल्या व्यथा मांडल्या. ब्रह्मांड परिसरात राहणाऱ्या नम्रता सावंत पूर्वी पीएमसी बँकेत नोकरी करीत होत्या. त्यांच्या कुटुंबातील सर्वाचे पीएमसी बँकेत खाते आहे. त्यांच्या सासू विजयालक्ष्मी (७१) यांच्या गुडघ्याचे उपचार करायचे होते. त्यासाठी ५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, ते पैसेही बँकेत अडकल्याने उपचार कसे करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
ठाण्यात १८ हजार खातेदार: आम्ही सरकारकडे भीक मागत नसून आमच्या हक्काचे पैसे मागत आहोत, असे खातेदार रवी सिंह यांनी सांगितले. अनेक ज्येष्ठ नागरिकांची पीएमसी बँकेत खाती आहेत. मात्र, बँक बंद झाल्याने त्याचा भरुदड ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच खातेधारकांना सहन करावा लागत असल्याचे डॉ. मीनल पाटील यांनी सांगितले. ठाणे शहरामध्ये पीएमसी बँकेचे १८ हजारहून अधिक खातेदार आहेत. त्या सर्वाचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात आम्ही काही दिवसांपूर्वीच जनहित याचिका दाखल केल्याची माहिती अनिल सोनावणे यांनी दिली.
शिष्टमंडळाची आज भांडुपमध्ये बैठक : पीएमसी बँक प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही दिवसांपूर्वीच संपर्क केला असून, त्यांनी निवडणूक झाल्यानंतर तात्काळ खातेदारांना न्याय देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती या मोर्चात सहभागी झालेले भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी दिली. तसेच सोमवारी भांडुप येथे रिझव्र्ह बँकेने नेमलेल्या प्रशासक आणि खातेदारांच्या शिष्टमंडळाची एक बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.