देश
“मनमोहन सिंग यांच्या परदेश दौऱ्याची संख्या नरेंद्र मोदींपेक्षाही जास्त”
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षाही जास्त परदेश दौरे केला असल्याचा दावा भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे हजारो लोक विमानतळाबाहेर जमा होतात आणि मोदींच्या नावे घोषणाबाजी करतात. यामुळे काँग्रेसच्या पोटात दुखत आहे. त्यामुळेच मोदी खूप परदेश दौरे करतात असा आरोप काँग्रेस करत असतं,” असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
यावेळी अमित शाह यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेतील ह्युस्टन येथे पार पडलेल्या नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाचा उल्लेख करत नरेंद्र मोदी जगातील सर्वात प्रसिद्ध पंतप्रधान असल्याचं सिद्ध होत आहे असं सांगितलं. मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यातील फरक सांगताना अमित शाह यांनी टीका करत म्हटलं की, “मनमोहन सिंग कागदावर जे लिहिलं आहे, जे मॅडम लिहून द्यायच्या तेच वाचायचे. मनमोहन सिंग यांनी मलेशियात रशियासाठी लिहिलेलं भाषण वाचलं होतं”.
२७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानतळावरील फोटोंचा कोलाज करत पोस्ट केला होता. या फोटोतून त्यांनी जागतिक पर्यटन दिनाच्या शुभेच्छा देत मोदींना टोला लगावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेश दौरे हा नेहमीच विरोधकांचा टीकेचा विषय राहिला आहे. भाजपाने मात्र नेहमी मोदींच्या मुत्सद्दीपणामुळे भारताचं जागतिक स्थान उंचावत असून अनेक परदेशी गुंतवणूक भारतात होत असल्याचा दावा केला आहे.
डिसेंबर महिन्यात केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांनी संसदेत माहिती देताना सांगितलं होतं की, नरेंद्र मोदींनी मे २०१४ रोजी पंतप्रधानपद हाती घेतल्यापासून ४८ परदेश दौरे केले असून ५५ देशांना भेट दिली.