Menu

अपराध समाचार
वीज पडून दोन तरूण शेतकऱ्यांचा मृत्यू

nobanner

नांदेड जिल्ह्यामध्ये अंगावर वीज पडून दोन तरूण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पांडुरंग विनायक जाधव आणि रोहित रामदास गेडाम असे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. पहिली घटना नांदेड तालुक्यातील सिरपल्ली शिवारात दि. ३० बुधवारी सायंकाळी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली. पांडुरंग विनायक जाधव (वय २९) रा.सिरपल्ली ता.हिमायतनगर असे मृत्यूमुखी पडलेल्या अल्पभुधारक शेतकऱ्याचे नाव आहे.

तालुक्यात गेली पंधरा दिवसा पासुन परतीचा पाऊस सुरू आहे, अधुन मधुन सायंकाळच्या वेळी विजांचा गडगडाट होत आहे. त्यामुळे बहुतेक शेतकर्यांची कामे बंदच आहेत. पांडुरंग जाधव हे शेताकडे चक्कर लावण्यासाठी गेले असता बुधवारी दुपारी अचानक पाऊस सुरू झाला यातच ढगांचा गडगडाट होवुन पांडुरंग याचे अंगावर विज पडली, त्यांचा मृत्यु झाला.

मंगळवारी भाऊबीज झाली, बुधवारी भावाचा मृत्यु झाल्याने माहेरी आलेली बहीण धायमोकलून रडत होती. अख्ख्या जाधव कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. ऐन दिवाळीत तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. सततच्या पावसामुळे हाताशी आलेल्या पिकांची नासाडी झालेली असतांना शेतकऱ्यावर वीज पडून मृत्यूची घटना समोर आली आहे. मयताच्या कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.

दुसऱ्या एका घटनेमध्ये १९ वर्षीय तरूणाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. शेतात बैल चारण्यासाठी गेलेल्या युवकाच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार (दि.30) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास माहूर तालुक्यातील सारखणी परिसरात घडली. रोहित रामदास गेडाम (वय 19) असे मृत युवकाचे नाव आहे. माहूर तालुक्यातील सारखणी येथील रोहित गेडाम हा मंगळवारी दुपारी शेतात गुरे चारण्यासाठी गेला होता. दरम्यान दुपारच्या सुमारास वादळी वार्‍यासह विजांचा कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. यावेळी अचानक रोहितच्या अंगावर वीज कोसळल्याचे परिसरातील नगारिकांच्या लक्षात आले. त्यानंतर रोहितला तात्काळ उपचारासाठी दहेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तपासणीअंती डॉक्टरांनी रोहितला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोहेकॉ दारासिंग चौहाण व हेमंत मडावी यांनी घटनास्थळी धाव घेतली.