Menu

देश
सरकार उभारणार 1 हजार 400 किलोमीटरची ‘ग्रीन वॉल’ ऑफ इंडिया

nobanner

केंद्र सरकारने देशातील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 1 हजार 400 किलोमीटर लांबीची ‘ग्रीन वॉल’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिकेत सेनेगल पासून जिबूतीपर्यंत तयार करण्यात आलेल्या हरित पट्ट्याच्या धर्तीवर गुजरातपासून दिल्ली-हरियाणाच्या सीमेपर्यंत ‘ग्रीन वॉल ऑफ इंडिया’ उभारण्यात येणार आहे. ही ग्रीन वॉल लांबीला 1 हजार 400 किलोमीटर तर रूंदीला 5 किलोमीटर इतकी असणार आहे. वातावरणातील बदलांशी सामना करण्यासाठी आफ्रिकेत अशी भिंत उभारण्यात आली आहे. याला ‘ग्रेट ग्रीन वॉल ऑफ सहारा’ असंही म्हटलं जातं.

सध्या हा प्रकल्प सुरूवातीच्या टप्प्यात आहे. जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर भविष्यकाळात वाढत्या प्रदुषणाला रोखण्यासाठी याकडे एक उदाहरण म्हणून पाहता येऊ शकते. थार वाळवंटातून ही भिंत विकसित केली जाणार आहे. याव्यतिरिक्त गुजरात, राजस्थान, हरियाणा ते दिल्लीपर्यंत परसलेल्या अरावली डोंगरावरील कमी होणाऱ्या हरित पट्ट्याच्या संकटावरही मात करता येऊ शकते. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ग्रीन वॉल ऑफ इंडियामुळे पश्चिम भारत आणि पाकिस्तानातील वाळवंटातून दिल्लीपर्यंत येणारी धूळही रोखण्यात मदत मिळणार आहे. भारतातील कमी होणारा हरित पट्टा आणि वाढतं वाळवंट रोखण्यासाठी ही कल्पना संयुक्त राष्ट्रांच्या कॉन्फरन्समधून मिळाली आहे. सध्या ही कल्पना प्राथमिक टप्प्यात असून अद्याप ती मंजुरीपर्यंतदेखील पोहोचली नसल्याचं एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं. आफ्रिकेतील ग्रेट ग्रीन वॉलवर एका दशकापूर्वी काम सुरू करण्यात आलं होतं. परंतु अनेक देशांचा सहभाग आणि त्यांच्या निरनिराळ्या कार्यप्रणालींमुळे अद्यापही ते पूर्ण होऊ शकले नाही. भारत सरकार आपली ही कल्पना 2030 पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सध्या काम करत आहे. या अंतर्गत 26 दशलक्ष हेक्टर जमिन प्रदूषणमुक्त करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.