देश
२८ दिवस समुद्रात, दोन वादळांमधून बचावला… अखेर ओदिशाच्या किनाऱ्यावर पोहोचला
ओदिशाच्या पुरी जिल्ह्यातील किरीसही गावाच्या समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी एक बोट लागली. या बोटीतील माणसाला धड स्वत:च्या पायावरही उभे राहता येत नव्हते. या व्यक्तीचे नाव अमृत कुजुर असल्याचे चौकशीत समोर आले. अमृत कुजुर हे अंदमान-निकोबारच्या शाहीद द्वीप येथे राहणारे आहेत. अंदमान-निकोबारलगतच्या समुद्रातून जाणाऱ्या मोठ्या जहाजांना अन्नधान्य आणि पिण्याचे पाणी पुरवण्याचा अमृत कुजुर यांचा व्यवसाय आहे.
२८ सप्टेंबरला अमृत आणि त्यांचा मित्र अंदमान निकोबारवरून अशाच एका जहाजासाठी सामुग्री घेऊन निघाले होते. मात्र, त्यांची बोट एका वादळात अडकली. त्यामुळे त्यांची बोट पूर्णपणे भरकटली. वादळात त्यांच्या बोटीचेही पूर्णपणे नुकसान झाले होते. वादळात बोटीतील वजन कमी करण्यासाठी आम्ही सर्व सामुग्री समुद्रात फेकून दिली. त्यावेळी आम्ही मदतीसाठी आम्ही इतर जहाजांकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, बोटीतील वायरलेस फोन खराब झाल्यामुळे आमचा प्रयत्न फोल ठरला, असे अमृत कुजुर यांनी पोलिसांना सांगितले.
यानंतर काही दिवसांनी म्यानमारच्या नौदलाचे जहाज त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी आवश्यक ती सामुग्री आणि परत अंदमान-निकोबारला जाण्यापुरते इंधन अमृत कुजुर यांना उपलब्ध करून दिले. मात्र, दुर्दैवाने बंगालच्या उपसागराजवळ असताना त्यांची बोट आणखी एका वादळात सापडली. त्यामुळे अमृत कुजुर आणि त्यांच्या मित्राने समुद्रात नांगर टाकून तेथेच थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र, वादळाचा जोर प्रचंड असल्याने बोटीचा नांगर तुटला. तसेच प्रचंड लाटांमुळे त्यांच्या बोटीत पाणीही शिरले. मात्र, सुदैवाने त्यांची बोट बुडाली नाही. परंतु, यानंतर बोटीत असणारा २६० लीटर इंधनाचा साठा संपला. त्यामुळे अमृत कुजुर यांची बोट पुन्हा एकदा समुद्रात भरकटली.
वादळामध्ये बोटीतील जीवनाश्यक समुद्रात फेकल्या गेल्या. त्यामुळे बोटीत अन्न आणि पाणी उरले नव्हते. त्यामुळे अनेक दिवस अमृत कुजुर आणि त्यांचा मित्र दिव्यरंजन यांना उपाशी राहावे लागले. या काळात दोघेही जण टॉवेलच्या सहाय्याने समुद्राचे पाणी गाळून तहान भागवत होते. मात्र, रोजच्या उपासमारीमुळे दिव्यरंजन यांचा मृत्यू झाला. अमृत कुजुर यांनी दोन दिवस दिव्यरंजन यांचा मृतदेह बोटीतच ठेवला होता. मात्र, मृतदेह खूपच कुजू लागल्याने अमृत कुजुर यांनी तो समुद्रात टाकून देण्याचा निर्णय घेतला. यानंतर शुक्रवारी त्यांची बोट ओदिशाच्या किनाऱ्यावर लागली. त्यावेळी अमृत कुजुर यांच्या अंगात उभे राहण्याचेही त्राण नव्हते.
दरम्यान, आता डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, पोलिसांना अजूनही अमृत कुजुर यांच्याविषयी संशय आहे. अमृत कुजुर यांनी सांगितलेली माहिती खरी आहे का, याची तपासणी पोलिसांकडून सुरु आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.