देश
अध्यापकांच्या दुहेरी नियुक्तीला लगाम!
देशभरातील अभियांत्रिकी, पदविका अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनाच्या विविध महाविद्यालयांमध्ये अध्यापक एकाच वेतनात एका ठिकाणी काम करत असताना प्रत्यक्षात दोन किंवा अधिक संस्थांमध्ये कागदोपत्री शिकवत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये अशी खोटी दुहेरी अध्यापक नियुक्ती व्यवस्था सर्रास सुरू असून ही एआयसीटीई व विद्यार्थ्यांची फसवणूक आहे. याचा शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे आढळून आल्यामुळे एकावेळी अध्यापक दोन महाविद्यालयांमध्ये शिकवत असल्याची (फॅकल्टी) नोंद आढळल्यास संबंधित संस्थेवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतला आहे.
देशभरात अभियांत्रिकी शाखेची चार हजारांहून अधिक, तर पदविका अभियांत्रिकीची साडेतीन हजार महाविद्यालये आहेत. याशिवाय एआयसीटीईच्या अधिपत्याखाली देशभरात व्यवस्थापनशास्त्रासह सुमारे दहा हजार महाविद्यालये आहेत. काही संस्थांची दोन ते चार महाविद्यालये असतात. अशा ठिकाणी एकच अध्यापक दोन किंवा त्याहून अधिक महाविद्यालयांत काम करत असल्याचे कागदोपत्री दाखवविण्यात येते. प्रत्यक्षात एक अध्यापक एकावेळी एकाच ठिकाणी शिकवू शकत असतानाही दोन महाविद्यालयांमध्ये फॅकल्टी म्हणून त्याची नोंद केली जाते.
संस्थाचालकांनी नियमानुसार आवश्यक तितक्या अध्यापकांची भरती करणे अपेक्षित असतानाही संस्थाचालकांकडून आपल्या अखत्यारितील दोन महाविद्यालयांमध्ये एकच अध्यापक दोन ठिकाणी शिकवत असल्याचे दाखविण्याचे उद्योग बिनदिक्कतपणे चालू आहेत. जवळपास अशा प्रकारचे ४६ हजार ‘घोस्ट’ अध्यापक असल्याचे तक्रारीत उघड झाल्यानंतर एआयसीटीईने त्याची गंभीर दखल घेत एका विषयाचा अध्यापक एकाच वेळी दोन ठिकाणी असू शकत नाही, अशी भूमिका घेतली. एका अध्यापकाची दोन संस्थांमध्ये पटलावर नोंद आढळल्यास संबधित संस्थेवर कठोर कारवाई करण्याचे आदेशच एआयसीटीईने आता जारी केले आहेत.
नोंदणी आधारकार्डाशी संलग्न
याबाबत एआयसीटीईच्या नियामक मंडळाचे सदस्य व ‘आयएसटी’चे अध्यक्ष प्राध्यापक प्रतापसिंह देसाई यांनी सांगितले. यासाठी एआयसीटीईने अध्यापकांची नोंदणी आधारकार्डाशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आधारकार्डाशी अध्यापकाची संलग्नता केल्यामुळे एका प्राध्यापकाची नोंद दुसऱ्या महाविद्यालयाच्या पटलावर दाखवता येणार नाही, असेही प्राध्यापक देसाई यांनी सांगितले. याउपरही बनवाबनवी होऊ नये यासाठी दरवर्षी एआयसीटीईकडून एकूण महाविद्यालयांच्या दोन टक्के महाविद्यालयांची अचानक तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अशी होईल कारवाई..
एआयसीटीईच्या आदेशानुसार अशा प्रकारे अध्यापकांची दोन महाविद्यालयांमध्ये पटलावर नोंद आढळल्यास संबंधित महाविद्यालयांची प्रवेशक्षमता पहिल्या टप्प्यात दहा टक्के कमी केली जाईल तर दुसऱ्या टप्प्यात २० व ३० टक्के प्रवेशक्षमता कमी करण्यात येणार आहे. या उपरही एखाद्या संस्थेने पुरेसे अध्यापक नियुक्त करण्याऐवजी कागदोपत्री खोटे अध्यापक दाखविण्याचा उद्योग केल्यास महाविद्यालयाची मान्यता रद्द केली जाईल, असे याबाबतच्या आदेशात नमूद केले आहे.