Menu

देश
ई-शौचालयांचा गर्दुल्ल्यांकडून गैरवापर

nobanner

मीरा-भाईंदर शहरात उभारण्यात आलेल्या ई-शौचालयांची दुरवस्था झाली असून मद्यपी आणि गर्दुल्ल्यांकडून त्यांचा गैरवापर होत असल्याचे दिसून आले आहे. अनेक ई-शौचालयांमध्ये सिगारेट आणि मद्याच्या बाटल्या आढळल्या असून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मीरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी महापालिकेकडून नागरिकांसाठी ई-शौचालये उभारण्यात आले आहेत. परंतु त्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. महापालिकेच्या दुर्लक्षाचा फायदा शहरातील गर्दुल्ल्यांनी उचलला आहे. अनेक ई-शौचालयांमध्ये रात्रीच्या सुमारास अनेक मद्यपी मद्यसेवन करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना ई-शौचालयाचा वापर करणेही अवघड झाले आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेने ऑक्टोबर २०१८ मध्ये शहरात प्रायोगिक तत्त्वावर ११ ठिकाणी ई-शौचालये उभारण्याचा करार केला होता. या अत्याधुनिक ई-शौचालयाचा वापर करायचा असल्यास पाच रुपयांचे नाणे टाकून आत जावे लागते. आत वातानुकूलित स्वच्छतागृह, पाणी यांची सोय तसेच शौचालयाच्या बाहेरील बाजूस कोणीही गैरवापर किंवा नुकसान पोहोचवू नये यासाठी कॅमेऱ्याची सोय करण्यात आली होती. अशा शौचालयांची किंमत प्रत्येकी ८ लाख २५ हजार रुपये आहे. सृष्टी, हटकेश, एमआयजी कॉलनी, रामदेव पार्क, उत्तन रोड इत्यादी ११ ठिकाणी स्वच्छतागृहे सुरू झाली. परंतु त्याची देखभाल करण्यात आली नाही. देखभाल करण्याची जबाबदारी ठेकेदाराला देण्यात आली होती. परंतु ठेकेदार आणि पालिका दोघांकडून दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

ठेकेदाराला बोलावण्यात आले आहे. लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येणार असून ई-शौचालय सर्वाच्या वापराकरिता उपलब्ध होतील.

– बालाजी खतगावकर, आयुक्त, महापालिका

ई-शौचालय हे केवळ शहरात देखाव्याकरिता उभारण्यात आले आहेत. ई-शौचालयांची दुरवस्था झाली असतानाही प्रशासकीय अधिकारी त्याकडे लक्ष देत नाही हेच नवल आहे.