देश
गुलाबी चेंडूवर खेळणं म्हणजे भारत-पाक सामन्यासारखं: विराट
गुलाबी रंगाच्या चेंडूने खेळवल्या जाणाऱ्या देशातील पहिल्यावहिल्या दिवसरात्र कसोटी सामन्याची तुलना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याशी केली आहे. ‘गुलाबी चेंडूनं कसोटी खेळणं आव्हानात्मक असेल. विश्वचषकात होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याइतकंच ते थरारक असेल,’ असं विराटनं म्हटलं आहे.
भारतातील पहिला दिवसरात्र कसोटी सामना उद्या कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर होणार आहे. या ऐतिहासिक सामन्याची उत्सुकता एव्हाना शिगेला पोहोचली आहे. कसोटीच्या पहिल्या चार दिवसांची तिकीटे संपली आहेत. मात्र, ही कसोटी गुलाबी चेंडूसह होत असल्यानं क्रिकेटपटू सावध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. विराटची प्रतिक्रिया देखील काहीशी अशीच आहे. ‘गुलाबी चेंडूनं खेळणं कठीण असेल. गोलंदाजी कशी होतेय. फलंदाज चेंडूचा सामना कसा करतात हे पाहावं लागेल. सवय झाल्यानंतर खेळणं कदाचित सोपं जाईल,’ असं तो म्हणाला.
कोलकाता कसोटीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची चिन्हं आहेत. त्या विषयी विराटनं आनंद व्यक्त केला. ‘गुलाबी चेंडूविषयी लोकांना उत्सुकता आहे. अशी उत्सुकता एकेकाळी भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी असायची. तेव्हा दिग्गज क्रिकेटपटू मैदानात असायचे. सगळीकडं याच सामन्याची चर्चा व्हायची. आताही तसंच वातावरण आहे,’ असं तो म्हणाला.