Menu

देश
जे ठरलंय तेच होईल, शिवसेना नव्या प्रस्तावावर चर्चा करणार नाही- राऊत

nobanner

शिवसेना आणि भाजपमध्ये यापूर्वी जे ठरले आहे, तोच शिवसेनेचा प्रस्ताव आहे. शिवसेना आता कोणत्याही नव्या प्रस्तावावर चर्चा करणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. ते बुधवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपची नव्याने चर्चा करण्याची ऑफर साफ धुडकावून लावली. जे ठरलंय तोच शिवसेनाचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आम्ही कोणाकडे प्रस्ताव घेऊन जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच भाजपकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न झाला तर तो जनमताचा अनादर ठरेल, असा इशाराही राऊत यांनी दिला.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मंगळवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीचं सरकार स्थापन होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी बैठकीनंतर व्यक्त केला होता. तर भाजपच्या प्रस्तावावर शिवसेनेने लवकरच उत्तर द्यावे, अशी अपेक्षा सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली होती.

तत्पूर्वी संजय राऊत यांनी एक ट्विटही केले होते. ‘जो लोग कुछ भी नही करते है, वो कमाल करते है’, असा मजकूर या संदेशात लिहला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे राऊतांच्या या वक्तव्याचा मतितार्थ काय असावा, याची चर्चा सुरु झाली होती.

भाजपशी सुरु असलेल्या सत्तासंघर्षात संजय राऊत हे एकहाती शिवसेनेची बाजू मांडताना दिसत आहेत. ते दररोज पत्रकारपरिषद घेत असून भाजपला सातत्याने इशारे देत आहेत. कोणत्याही परिस्थितीत शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरून माघार घेणार नाही, हे त्यांनी वारंवार ठणकावून सांगितले आहे.