देश
टिकटॉक अॅपवर बंदीची मागणी; मुंबईतील गृहिणीकडून हायकोर्टात याचिका
तरुणांना वेड लावलेल्या टिकटॉक या मोबाईल अॅपविरोधात मुंबई हायकोर्टात एका गृहिणीने जनहितयाचिका दाखल केली आहे. मुलं सातत्याने या अॅपवर काम करीत असतात त्यामुळे त्यांच्यावर वाईट संस्कार होत असल्याने या अॅपवर बंदी घालण्यात यावी असे या महिलेने आपल्या याचिकेत म्हटले आहे. उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
हिना दरवेश असे याचिकाकर्त्या गृहिणीचे नाव असून त्यांना तीन मुलं आहेत. टिकटॉक अॅपमुळे मुलांवर वाईट संस्कार होत असल्याचे त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. टिकटॉकच्या माध्यमातून बनवलेले अनेक व्हिडिओ हे अश्लिल असतात तसेच यातील अनेक व्यंगात्मक व्हिडिओजमुळे तरुणांमध्ये आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहेत. जातीयवादी मुद्द्यांवरही या माध्यमातून व्हिडिओ तयार केले जात असल्याने ते अंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे हिना यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. अॅड. अली काशिफ यांच्यामार्फत त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.
टिकटॉक हे चीनी कंपनीकडून तयार करण्यात आलेले अॅप असून यामागे भारताविरोधात काही उद्देशही असू शकतो, अशी शंकाही या याचिकेतून व्यक्त करण्यात आली आहे. या व्हिडिओजमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा मलीन होत असल्याचेही याचिकेत याचिकाकर्त्याने म्हटले आहे.
यापूर्वी टिकटॉक अॅपच्या माध्यमातून गुन्हेगारी स्वरुपाचे चित्रण केल्याने मुंबई पोलिसांनी दोन गुन्हे नोंदवले होते. मात्र, त्यावर विशेष कारवाई झाली नव्हती. तसेच मद्रास हायकोर्टातही यापूर्वी या अॅपविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.