Menu

खेल
नाबाद त्रिशतकी खेळीसह वॉर्नरने मोडला डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम

nobanner

सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने झळकावलेल्या नाबाद त्रिशतकी खेळाच्या जोरावर, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटी सामन्यात धावांचा डोंगर उभा केला आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ५८९ धावांवर आपला डाव घोषित केला. वॉर्नरने ४१८ चेंडूत ३३५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ३९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या खेळीदरम्यान वॉर्नरने माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू डॉन ब्रॅडमन यांचा विक्रमही मोडला.

कसोटी क्रिकेटमधलं वॉर्नरचं हे पहिलं त्रिशतक ठरलं. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून त्रिशतक झळकावणारा वॉर्नर चौथा खेळाडू ठरला आहे. याचसोबत अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही आता वॉर्नरच्या नावे जमा झाला आहे. याआधी २९ जानेवारी १९३२ रोजी ब्रॅडमन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अ‍ॅडलेडच्या मैदानावर नाबाद २९९ धावांची खेळी केली होती. वॉर्नरने आज त्रिशतक झळकावत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

डेव्हिड वॉर्नरने लॅबुसचेंजसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३६१, स्टिव्ह स्मिथसोबत १२१ तर मॅथ्यू वेडसोबत ९९ धावांची भागीदारी केली. या खेळीमुळे दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. पाकिस्तानचे सर्व गोलंदाज वॉर्नरसमोर अपयशी ठरले. शाहीन आफ्रिदीने ३ फलंदाजांना माघारी धाडलं, त्याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला यश मिळालं नाही.