Menu

देश
‘महा’चक्रीवादळाचा परिणाम, आजही पावसाचा इशारा

nobanner

पूर्व-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘महा’चक्रीवादळामुळे मुंबई परिसरात शुक्रवारी पाऊस झाल्याने लोकांची तारांबळ उडाली. पुढील दोन दिवस शहरातील वातावरण ढगाळ असेल आणि हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

‘महा’चक्रीवादळ वायव्येकडे सरकत असले, तरी राज्यावरील त्याचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे आज, शनिवारी, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दिवाळीचे तीन-चार दिवस आकाश निरभ्र होते. कडक उन्हामुळे ऑक्टोबर हीटचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना शुक्रवारी संध्याकाळी पावसाने भिजवले. कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांची त्रेधातिरपीट उडाली. शहरात संध्याकाळी चारच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि थोडय़ाच वेळात वाऱ्यासह रिमझिम पाऊस सुरू झाला. पूर्व उपनगरातील चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, कुर्ला भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. शहरातील काही भागांत दोन ते तीन तास पावसाचा जोर होता. पाऊस थांबेल या आशेवर ताटकळत राहिलेल्या नोकरदारांना अखेर भिजतच घर गाठावे लागले.

कयार चक्रीवादळाचा प्रभाव आता कमी झाला आहे. परंतु ‘महा’ चक्रीवादळ निर्माण झाल्याने पुन्हा पावसाची स्थिती तयार झाली. सध्या हे चक्रीवादळ लक्षद्वीप आणि त्यालगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर आहे. त्याच्या बाह्य़ परिघाचा विस्तार कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांपर्यंत आहे. सध्या त्याचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

‘मिम्स’चाही पाऊस

मुंबईत पुन्हा पाऊस पडल्याने समाजमाध्यमांवरही पुन्हा पावसावरील विनोदांना उधाण आले आहे. ‘आता मुख्यमंत्री बघितल्याशिवाय जाणार नाही’ इथपासून ते ‘पावसाचा निर्णय बदलण्याआधी सरकार स्थापन करा, अन्यथा पाच वर्षे सरकार कसे चालतेय ते पाहून जातो’, अशा विनोदांचा पूर समाजमाध्यमांवर सुरू आहे.

मच्छीमारांना इशारा : जोरदार वाऱ्यामुळे पुढील दोन दिवस दक्षिण आणि उत्तर कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या जोरदार लाटा उसळतील. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस झाला. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत मुंबई, पुणे, मालेगाव, नाशिक, महाबळेश्वर येथे पावसाची नोंद झाली.