देश
महापालिकेची ९६ कोटी करवसुली
वसई-विरार महापालिकेने यंदाच्या वर्षीही मालमत्ता कर वसूल करण्यावर भर दिला असून या वर्षी आतापर्यंत ९६ कोटी रुपये इतक्या मालमत्ता कराची वसुली केली आहे. म्हणजेच २७ टक्के इतका कर वसूल करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
मालमत्ता कर हे महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. या करातूनच शहरातील विविध विकासकामे होऊ शकतात. यासाठी मागील वर्षांपासून वसई-विरार महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसंदर्भातील धोरण तयार करून त्यानुसार मालमत्ता कर वसूल करण्यावर पालिकेने भर दिला आहे.
या महिन्याच्या अखेपर्यंत ११० कोटींचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यानुसारच कर वसुली सुरू असल्याची माहिती मालमत्ता कर संकलन विभागाने दिली आहे.
सध्या पालिका क्षेत्रात नव्याने मालमत्ताधारकांची नोंदणी झाली असल्याने साडेसात लाखांहून अधिक औद्योगिक आणि वाणिज्य असे मालमत्ताधारक आहेत. या मालमत्ताधारकांना नेमण्यात आलेल्या करवसुली पथकाकडून देयके देण्याचे काम व वसूल करण्याचे काम सुरू केले आहे.
मध्यंतरी निवडणूक काळात पालिकेचे कर्मचारी निवडणुकांच्या कामामध्ये व्यस्त असल्याने मालमत्ता कर वसुली थंडावली होती. मात्र पुन्हा एकदा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर वसुली करण्यावर पालिकेने आपले लक्ष केंद्रित केले असून शहरातील नऊही प्रभागांतून कराची वसुली करण्यास सुरुवात केली आहे.
मालमत्ता कर आकडेवारी
वर्ष २०१८ नोव्हेंबर – ८१.५४ कोटी (२३.७९ टक्के)
वर्ष २०१९ नोव्हेंबर – ९६ कोटी (२७.४४ टक्के)
चार टक्के अधिक वसूल
मागील वर्षी नोव्हेंबर २०१८ मध्ये ८१ कोटी ५४ लाख म्हणजे २३ टक्के इतका मालमत्ता कर वसूल केला होता तर यंदाच्या चालू नोव्हेंबर २०१९ पर्यंत पालिकेने ९६ कोटी म्हणजेच २७ टक्के इतका मालमत्ता कर वसूल केला असून मागील वर्षीच्या तुलनेत चार टक्के अधिकचा कर वसूल झाला आहे.
निवडणूक काळात कर वसुलीचे काम संथ होते. मात्र, तरीही मागील वर्षांपेक्षा यंदाच्या वर्षी चांगली वसुली करण्यात आली आहे. यापुढेही वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रत्येक प्रभागातून मालमत्ता कराची वसुली करण्यावर भर दिला जाणार आहे.