देश
राज्यात भाजपाचे नाही, शिवसेनेचेच सरकार येणार-जयंत पाटील
राज्यात भाजपाचे नाही तर शिवसेनेचेच सरकार येणार असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. भाजपाने शिवसेनेचे आमदार फोडले तर पोटनिवडणुकीत आम्ही पाठिंबा देऊ आणि शिवसेनेचे आमदार पुन्हा निवडून आणू असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आता जयंत पाटील यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, या निकालात भाजपाचे १०५, शिवसेनेचे ५६, काँग्रेसचे ४४ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आमदार निवडून आले. आता भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल आणि १४५ ची मॅजिक फिगर गाठायची असेल तर शिवसेनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंबा देऊ शकतात. याच सगळ्याबाबत प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी राज्यात भाजपाचे नाही तर शिवसेनेचे सरकार येईल असे म्हटले आहे. शिवसेनेतर्फे संजय राऊत यांनी रविवारी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी आम्ही १७० चा आकडा बहुमत सिद्ध करण्यासाठी गाठू शकतो असे म्हटले होते. आता या सगळ्याबाबत भाजपा काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सरकार स्थापनेचा दावा कोणीही केलेला नाही. महायुती म्हणून जरी शिवसेना आणि भाजपा हे दोन पक्ष निवडणूक लढले असले तरीही भाजपाचा मुख्यमंत्री करायचा असल्यास शिवसेनेचा आधार घेतल्याशिवाय गत्यंतर नाही अशी स्थिती आहे. या सगळ्या गोंधळात राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला तर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसही त्यांना पाठिंबा देऊ शकते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीत आज सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होऊ शकते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं सरकार स्थापनेचा दावा कोण करणार आणि मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण शिवसेनेने भाजपासोबत जाण्यासाठी अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा या दोन अटी ठेवल्या आहेत. या अटींवरच दोन्ही पक्षांमधली चर्चा थांबली आहे. ही कोंडी फुटेल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला होता. तसं होण्याची चिन्हं मात्र दिसत नाहीत. त्यात आज जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नेमकं काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.