शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रदूषणमुक्त शहरासाठी सायकल
- 232 Views
- November 03, 2019
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रदूषणमुक्त शहरासाठी सायकल
- Edit
शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रदूषणमुक्त पुणे शहरासाठी सायकल वापरण्याविषयी प्रबोधन करणारा सायकल फेरी हा उपक्रम गेल्या दोन दशकांपासून पुण्यामध्ये रूजला आहे. पुणे सायकल प्रतिष्ठानतर्फे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सायकल चालविण्याचे सामाजिक आणि वैयक्तिक फायदे याविषयी जनजागृती करण्यात येते. रविवारी (३ नोव्हेंबर) ॐकारेश्वर मंदिर येथून सकाळी आठ वाजता सायकल फेरी निघणार आहे.
सायकलींचे शहर ही एकेकाळच्या पुण्याची ओळख होती. १९९० च्या दशकानंतर दुचाकी वाहन गरजेचे झाल्यामुळे काळाच्या ओघात सायकलींचे शहर ही प्रतिमा पुसट होऊ लागली. त्यामुळे सायकल या स्वयंचलित वाहनाचे सामाजिक आणि वैयक्तिक फायदे समजावून सांगत सायकलचा वापर करण्यासंदर्भात नागरिकांचे प्रबोधन करण्याच्या उद्देशातून १९९७ मध्ये डॉक्टर मित्रांनी एकत्र येत पुणे सायकल प्रतिष्ठानची स्थापना केली. बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप सारडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. स्त्री आरोग्य आणि प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ डॉ. शिरीष पटवर्धन उपाध्यक्ष आणि नंदकुमार भटेवरा सचिव आहेत. दत्तात्रय मेहेंदळे, आनंद आठल्ये, मुकुंद काजळे आणि अरुण मालपुरे यांच्यासह चारशेहून अधिक सभासद आहेत.
सायकलमुळे प्रदूषण कमी होते. लोक तुम्हाला सायकलवरच बघत असल्यामुळे सायकल वापराचा आपोआप प्रचार आणि प्रसार होत असतो. हे सायकल वापरण्याचे सामाजिक फायदे आहेत, असे डॉ. शिरीष पटवर्धन यांनी सांगितले. कमी अंतराच्या म्हणजे तीन किलोमीटपर्यंतच्या प्रवासासाठी सायकल वापरणे योग्य ठरते. इंधन असलेल्या वाहनाद्वारे तीन किलोमीटर अंतराच्या प्रवासामध्ये सर्वाधिक प्रदूषण होते, असे पाश्चात्त्य अहवालामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे कमी अंतराचा प्रवास चालत किंवा सायकलने करणे योग्य ठरते, याकडे पटवर्धन यांनी लक्ष वेधले.
सायकल चालविणे हा उत्तम शारीरिक व्यायाम आहे. रस्त्यावर सायकल चालविण्यासाठी तसेच सायकलच्या पार्किंगला जागा कमी लागते. सायकल चालविण्यामुळे इंधनाची बचत होते. जंगली महाराज रस्ता ते दशभुजा गणपती हे अंतर बस किंवा रिक्षाने जाण्यासाठी किमान ३५ मिनिटे लागतात. सायकलने त्यापेक्षाही कमी वेळात पोहोचता येते. सुटीच्या दिवशी मजा किंवा हौस म्हणूनही सायकल चालविणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बॅडिमटन खेळायला जाताना, पोहायला जाण्यासाठी आता अनेक जण सायकलचा वापर करत आहेत, असे पटवर्धन यांनी सांगितले.
देशभरातील परिषदांनाही सायकलवरून!
देशभरात विविध ठिकाणी होणाऱ्या डॉक्टरांच्या परिषदेला प्रतिष्ठानचे सदस्य सायकलवरूनच जातात. आतापर्यंत हैदराबाद, बंगळूर, मडगाव, कोची, कोलकता, भुवनेश्वर, वाराणसी, दिब्रूगड, गुवाहाटी, म्हैसूर, चैन्नई, कन्याकुमारी अशा विविध ठिकाणी सायकल फेरीद्वारे परिषदांना उपस्थिती लावण्यात आली. यातूनच सायकल वापराविषयी प्रबोधन करण्याच्या उद्देशातून पुणे सायकल प्रतिष्ठानची स्थापना झाली. प्रतिष्ठानतर्फे गुणवंत आणि गरजू मुलांना ५१ सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शाळांमध्ये सायकल वापराचे फायदे याविषयी माहितीपत्रकांचे वाटप केले जाते, असे नंदकुमार भटेवरा यांनी सांगितले.