देश
शिवसेनेचा भाजपाला पहिल्याच दिवशी धक्का; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पकडलं कोंडीत
‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या शिवसेना खासदारांची बसण्याची जागा विरोधी बाकांवर करण्यात आल्यानंतर शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाला कोंडीत पकडलं आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं. त्याबदल्यात शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत कमी असल्याचे सांगत शिवसेनेनं या मुद्यावर लोकसभेत तहकूब करण्याची नोटीस दिली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्तास्थापन करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. शिवसेनेच्या निर्णयानंतर भाजपानं शिवसेना ‘एनडीए’तून बाहेर पडल्याची घोषणा केली. तसेच शिवसेनेच्या संसद सदस्यांची जागाही बदलण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी दिली. भाजपाच्या या भूमिकेनंतर शिवसेना संसदेत आक्रमक झाली आहे.
आजपासून (१८ नोव्हेंबर) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले आहे. राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तोकडी असून, शेतकऱ्यांना २५ हजार रूपये मदत देण्याच्या मागणीसाठी शिवसेना मोदी सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी संसद परिसरात आंदोलनं केले. तसेच मदतीसाठी लोकसभेत तहकूब नोटीस दिली आहे.
शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी असून अवेळी पावसाने त्यांना किमान २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्याची शिवसेनेची मागणी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात केलेल्या दौऱ्यांच्या वेळी ही भूमिका मांडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक मदत मिळाली पाहिजे, अशी शिवसेनेची मागणी असून विविध माध्यमांमधून संसदेत ती आक्रमकपणे मांडली जाईल, असे राऊत यांनी ‘लोकसत्ता’ला अधिवेशन सुरू होण्याच्या आधी सांगितलं होतं.