देश
शेतकऱ्यांबद्दल आस्था की नौटंकी? पीक विम्याशी संबंध नसलेल्या कंपनीत शिवसैनिकांचा राडा
शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले जात नसल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी पुण्यामध्ये इफ्को टोकिओ या विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये तोडफोड केली. बुधवारी सकाळी पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातील मंगलदास मार्गावरील कार्यालयात हा प्रकार घडला. मात्र यानंतर हाती आलेल्या माहितीनुसार, इफ्को टोकिओ कंपनीचा सध्या शेतकरी पीक विम्याशी कोणताही संबंध नसल्याची बाब समोर येते आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी केलेला राडा ही शेतकऱ्यांप्रती आस्था की नौटंकी असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.
कृषी आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामाकरता राज्यात दोन कंपन्यांकडून विमा उतरवला गेला आहे. हिंगोली, नागपूर जिल्ह्यात पीक विमा काढण्याचं काम बजाज अलायन्स कंपनीकडून तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं काम अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीला देण्यात आलं आहे. यंदाच्या खरीप हंगामात राज्यातून १ कोटी २७ लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरुन पीक विमा उतरवला आहे, मात्र या प्रक्रियेत इन्फो टोकिओ कंपनीचा कुठेही सहभाग नाहीये.
इन्फो टोकिओ कंपनीकडे २०१८ साली पीक विम्याचं काम होतं आणि या काळात कंपनीने सर्व शेतकऱ्यांना विम्याचे पैसे अदा केल्याचंही कृषी आयुक्तालयाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती नसताना आंदोलन केलं का असा प्रश्न पुण्यात विचारला जाऊ लागला आहे.
काय म्हणणं आहे पीक विमा कंपनीचं?
पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात सुमारे ४०-५० जणांचा गट कार्यालयात घुसला आणि त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. त्यांची नेमकी समस्या काय होती हे आम्हाला माहिती नाही, त्यांनी कोणत्याही विषयावर आमच्याशी चर्चा केलेली नाही. मात्र इन्फो टोकिओ कंपनी महाराष्ट्र सरकारच्या २०१९ सालच्या पीक विमा योजनेत सहभागी झालेली नाही. २०१८ सालच्या खरीप हंगामात ज्या-ज्या शेतकऱ्यांचे पैसे देणं होतं ते कंपनीने वेळेत पूर्ण केलं आहे.