देश
इक्बाल मिर्चीच्या ६०० कोटींच्या मालमत्तेवर टांच
गँगस्टर इक्बाल मिर्चीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाच्या संबंधात मिर्चीची ६०० कोटी रुपये बाजारमूल्याची मालमत्ता आपण गोठवली असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी सांगितले.
या मालमत्तांमध्ये मुंबईच्या वरळी भागातील सीजय हाऊसचा तिसरा व चौथा मजला, अरुण चेंबर्स, ताडदेव येथील एक कार्यालय, वरळीच्या साहिल बंगल्यातील ३ फ्लॅट्स, क्रॉफर्ड मार्केटमधील ३ मोक्याची व्यावसायिक दुकाने, तसेच लोणावळा येथील बंगले आणि ५ एकरहून अधिक जमीन यांचा समावेश असल्याचे ईडीने एका निवेदनात म्हटले आहे. या मालमत्ता मिर्चीने त्याच्या कुटुंबीयांच्या व नातेवाईकांच्या नावे खरेदी केल्या होत्या.
याच प्रकरणात ईडीने अलीकडेच इक्बाल मिर्चीविरुद्ध मुंबईच्या एका विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
हाफिज सईदवर आरोपपत्र
लाहोर : मुंबईतील २००८ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद व त्याच्या तीन साथीदारांवर पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयाने बुधवारी आरोपपत्र दाखल केले. त्यात दहशतवादास पैसा पुरवल्याच्या आरोपाचा समावेश आहे. हाफिज अब्दुल सलमान, महंमद अशरफ, झफर इक्बाल यांच्यावरही आरोप ठेवले आहेत.