दुनिया
डेटिंग साईटवर तरुणीला शोधणं पडलं महागात, पुण्यातील तरुणाला लाखोंचा गंडा
डेटिंग साईटवर तरुणीला शोधणे एका एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित व्यक्तीची तब्बल ६५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. जयंत विश्वनाथ ढाळे (४०) असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते एका नामांकित कंपनीत काम करतात. जंयत ढाळे यांची पहिल्या वेळी ४२ लाख तर दुसऱ्या वेळेस २३ लाख रुपये अशी दोन वेळा फसवणूक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड सायबर क्राइम याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत ढाळे गुगलवर डेटिंग साईट तरुणीचा शोध घेत होते. यावेळी जयंत यांना एक मोबाइल क्रमांक आढळला. जयंत यांनी संबंधित क्रमांकावर फोन करून चौकशी केली असता रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर पुढील सर्व्हिस मिळेल असं सांगण्यात आलं. त्यांनी १२०० रुपये भरून रजिस्ट्रेशन केले. परंतु, वेगवेगळे कारण सांगून त्यांना राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. त्यांनी पहिल्यांदा ४२ लाख रुपये भरले. तरी देखील सर्व्हिस न मिळाल्याने अखेर फिर्यादी यांनी प्रोफाइल रद्द करण्यास सांगितलं.
त्यासाठी त्यांना प्रोफाइल क्लोजर, कमिशन होल्डिंग चार्ज, अकाउंट व्हेरिफिकेशन, रजिस्ट्रेशन कॅन्सलेशनसाठी वेगवेगळी कारणं सांगत वेगवेगळ्या क्रमांकावरुन फोन करत बँकांमध्ये भरण्यास सांगितलं. अशा पद्धतीने जयंत ढाळे यांना ६५ लाख रुपयांच्या घरात आहे. दरम्यान, या सर्व डेटिंग साईट देशाबाहेरील आहेत आणि ही घटना मे ते सप्टेंबर महिन्यात घडलेली आहे. सायबर क्राइमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यासंबंधी अधिक तपास करत आहेत.