देश
ITBP जवानानं आपल्याच सहकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या, ६ ठार तर २ जखमी
छत्तीसगडच्या नारायणपूरमधून एक धक्कादायक हत्याकांड समोर आलंय. सुरक्षादलाच्या एका जवानानं आपल्याच सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. या घटनेत सहा जवानांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झालेत. आपल्या सहकाऱ्यांवर गोळ्या झाडणाऱ्या जवानाचाही या घटनेत मृत्यू झालाय. हे जवान आयटीबीपी (ITBP – इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस) मध्ये कार्यरत असल्याचं समजतंय.
बस्तरच्या महानिरीक्षकांनी या घटनेला दुजोरा दिलाय. नारायणपूरचे पोलीस अधिक्षकांच्या म्हणण्यानुसार, आयटीबीपीच्या जवानांमध्ये आपआपसांत झालेल्या फायरिंगमध्ये या सहा जणांचा मृत्यू झालाय. जखमी झालेल्या दोन जवानांवर उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्या जवानांचे मृतदेह रायपूरला आणण्यात येतील.
आपल्याच साथीदारांवर गोळीबार करणाऱ्या जवानाचं नाव रहमान खान असं आहे. आयटीबीपी कॅम्प कडेनारमध्ये आपल्या खासगी हत्यारानं त्यानं जवानांवर गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येतंय.
या घटनेची माहिती मिळताच, जवानांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी घटनास्थळी तातडीनं हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं, अशी माहिती छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी दिली.