Menu

देश
एक्स बॉयफ्रेण्डने केली प्रेयसी आणि तिच्या आईची हत्या; कारण वाचून धक्का बसेल

nobanner

दिल्लीतील न्यू अशोक नगर या उच्चभ्रू वस्तीमध्ये एका महिलेचा आणि तिच्या मुलीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी रात्री घडलेल्या या हत्याकांडाचा खुलासा सोमवारी सकाळी घरकामासाठी आलेल्या मोलकरणीमुळे झाला. नेहमीप्रमाणे सकाळी कामावर आलेल्या मोलकरणीने घराचा दरवाजा उघडला तेव्हा मायलेकीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले होते. सुमिता (वय ६०) आणि समरिता (२५) या दोघींवर चाकूने वार करुन त्यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले.

होळीच्या आदल्या दिवशीच मायलेकीचा खून झाल्याने परिसरामध्ये एकच खळबळ माजली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास सुरु केला असता त्यांना सीसीटीव्हीमध्ये रात्रीच्या सुमारास इमारतीमधून दोघेजण गाडीतून संक्षयितपणे बाहेर पडताना दिसले. यापैकी एक तरुण हा समरिताबरोबर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. हा मुलगा गढी गावातील अमर कॉलीनीमध्ये राहणारा विक्रांत नागर असल्याचे सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे केरळमधील असणाऱ्या या मायलेकी मागील २० वर्षांपासून वसुंधरा एइक्लेव्हमधील मनसारा अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. २२ वर्षांपूर्वी सुमिताच्या पतीचा मृत्यू झाला असून त्यानंतर दोन वर्षांनी या दोघी मनसारामध्ये तिसऱ्या मजल्यावर रहायला आल्या. सुमिता नोएडामधील एका खासगी कंपनीमध्ये उच्च पदावर कामाला होती. तर मुलगी हॉटेल मॅनेजमेंटच्या पदवीचे शिक्षण घेतलं होतं. ती एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये इन्टर्न म्हणून काम करत होती.

सीसीटीव्हीमध्ये दिसली गाडी

पोलिसांनी इमारतीच्या आवारातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता त्यांना रात्री तीन ते चारच्या दरम्यान एक गाडी भरधाव वेगाने इमारतीच्या बाहेर जाताना दिसली. या गाडीने इमारतीच्या गेटला धडक दिली. त्यामुळे सुरक्षारक्षकाने चौकशी केली असता गाडीमध्ये ओळखीचा चेहरा दिसला. मुख्य आरोपी असणारा विक्रांत हा नेहमी समरिता भेटायला यायचा त्यामुळे तो त्याला ओळखत होता. विक्रांतने माफी मागितली आणि गाडी वेगाने पळवत तो निघून गेला. यावेळेस विक्रांतबरोबर आणखीन एक व्यक्ती असल्याची माहिती या सुरक्षारक्षकाने पोलिसांना दिली आहे. विक्रांतचे समरिताबरोबर प्रेमसंबंध असल्याने तो अनेकदा तिला भेटण्यासाठी यायचा असही या सुरक्षारक्षकाने पोलिसांना सांगितलं.

विक्रांत आणि समरिता मागील अनेक वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. काही दिवस ते लिव्ह इनमध्येही राहिले. मात्र त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झालं होतं. याच रागामधून विक्रांतने दोघांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. विक्रांतला अटक करण्यात आली असली तरी त्याचा मित्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

…म्हणून केली हत्या

समरिताची मैत्रिण असणाऱ्या प्रेरणाने या दोघे प्रेमात कसे पडले यासंदर्भातील माहिती दिली. “एका पार्टीमध्ये दोघांची भेट झाली. मग ते वरचेवर भेटत राहिले आणि प्रेमात पडले. मध्यंतरी ते लिव्ह इनमध्ये राहत होते. मात्र वर्षभरापूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले. समरिताला विक्रांत नकोसा झाला होता. त्याच्यापासून लांब जाण्यासाठी तिने दुसऱ्या एका मुलाबरोबर मैत्री केली. ती त्या मुलाबरोबर भटकू लागली, पार्ट्यांना जाऊ लागली. यावरुनच विक्रांत तिच्यावर प्रचंड संतापायचा. विक्रांत अनेकदा समरिताच्या घरीच रहायचा. समरिताची आई त्याला आर्थिक मदत करायची. मात्र ब्रेकअपनंतर त्याने त्यांच्याविषयी मनात राग धरला होता. त्यातच समरिता दुसऱ्या मुलाबरोबर भटकू लागल्याने त्याने रागातच या दोघींची हत्या केली असणार,” असं प्रेरणाने पोलिसांना सांगितलं.