देश
केईएममध्येही आजपासून ‘करोना’ तपासणी
करोनाच्या चाचणी केले जाणारे पॉलीमरेज चेन रिएक्शन(पीसीए) यंत्र केईएममध्ये उपलब्ध असून मंगळवारपासूनच ही सुविधा कार्यरत होणार आहे. याव्यतिरिक्त सुमारे ९० कोटी रुपयांचे अजून एक यंत्र पालिकेकडून खरेदी केले जाणार असून ते या आठवडय़ात उपलब्ध होईल. त्यामुळे केईएमच्या प्रयोगशाळेत दिवसभरात जवळपास ३०० चाचण्या करण्याची क्षमता कार्यरत होणार आहे.
मुंबईत सध्या कस्तुरबा रुग्णालयात करोनाची चाचणी केली जाते. एका वेळेस ३३ नमुन्यांच्या चाचणीची क्षमता येथे उपलब्ध आहे. या चाचणीस सुमारे तीन तासांचा कालावधी लागतो. शहरातील तपासणी यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी केईएममध्येही सुविधा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
केईएम रुग्णालयातील नवीन इमारतीत सातव्या मजल्यावरील मॉलीक्युलर प्रयोगशाळा विकसित केली जात आहे. पॉलीमरेज चेन रिएक्शन (पीसीए) या यंत्रावर न्यूक्लीक अॅसिड एक्सट्रॅक्शन या पद्धतीने ही तपासणी केली जाते. या प्रयोगशाळेसाठी आधीच हे यंत्र मागविलेले होते. एका वेळी १२ नमुन्यांची क्षमता असलेल्या या यंत्राची नमुना चाचणी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या मागदर्शनाखाली केल्यानंतर मंगळवारपासूनच या प्रयोगशाळेत चाचण्या करण्यास सुरुवात होईल. २४ तास ही सुविधा कार्यरत राहण्यासाठी एका पाळीमध्ये दोन तंत्रज्ञ, एक प्रयोगशाळा साहाय्यक असे तीन पाळ्यांमध्ये काम करण्यासाठी १६ जणांची नियुक्ती केलेली आहे, अशी माहिती केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली. एका वेळी सुमारे ९० नमुन्यांची चाचणी करता येईल असे अधिक क्षमतेचे अजून एक पीसीआर यंत्र पालिकेकडून खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे यंत्र सुमारे ९० कोटी रुपयांचे आहे. आठवडाभरात हे यंत्र रुग्णालयात दाखल होईल. हे यंत्र उपलब्ध होईपर्यंत सध्या प्रयोगशाळेत दिवसभरात ३६ जणांची चाचणीची सुविधा मंगळवारपासून उपलब्ध होणार आहे.
‘गर्दी करू नका’
केईएममधील प्रयोगशाळेत कस्तुरबामधून चाचणीचे नमुने आणले जातील आणि त्यांचे अहवाल कस्तुरबा रुग्णालयालाच परत पाठविले जातील. त्यामुळे कोणाची चाचणी करायला हवी, कोणाचे नमुने घ्यायचे हे सर्व कस्तुरबा येथील डॉक्टरच ठरविणार आहेत. कस्तुरबामधून नमुने आणण्यासाठीची सर्व सुविधा उपलब्ध केलेली आहे. यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकाही नेमलेली आहे. तेव्हा रुग्णांना तपासणीसाठी केईएमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे.
कशी होते ही चाचणी?
ही चाचणी करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या कापसाच्या बोळ्यांचा(स्व्ॉब) वापर केला जातो. हा बोळा घशाच्या मागच्या भागातून आणि नाकपुडीतून फिरवला जातो. या ठिकाणी अधिक प्रमाणात विषाणू असण्याचा संभव असतो. हा बोळा तपासणीसाठी पाठविला जातो.