देश
…तरीपण मोदी-शाह यांना शरण? काँग्रेसचा ज्योतिरादित्य शिंदेंना प्रश्न
मध्य प्रदेशमधील राजकीय नाट्यमय घडमोडी अद्याप सुरूच आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसला मोठा हादरा बसला. शिवाय, तब्बल २२ आमदारांनी राजीनामे दिले असल्याने राज्यातील मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार देखील संकटात आले आहे. ज्योतिरादित्य शिंदेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास घात केल्याचा आरोप केला आहे. शिवाय, त्यांना आतापर्यंत काँग्रेसने कोण कोणती पदं दिली हे देखील मध्य प्रदेश काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलं आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या १८ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत काँग्रेसने त्यांना १७ वर्षे खासदार बनवले, दोन वेळा केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय सरचिटणीस, उत्तर प्रदेशचे प्रभारी, कार्यसमिती सदस्य, निवडणूक अभियान प्रमुख बनवले. शिवाय, ५० पेक्षा जास्त तिकीटं व ९ मंत्री दिले, तरीही ते मोदी-शाह यांना शरण गेले, असं मध्य प्रदेश काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय, विश्वासाला तडा असं दर्शवणारं एक चित्र देखील काँग्रेसकडून ट्विट करण्यात आलं आहे.
ज्योतिरादित्य शिंदे आज दुपारी भाजपात प्रवेश करणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांचा मुलगा महानआर्यमनने देखील टि्वट करुन वडिलांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. ‘माझ्या वडिलांनी स्वत:साठी एक भूमिका घेतली. त्याचा मला अभिमान वाटतो. वारसा सोडण्यासाठी पण हिम्मत लागते’ असे महानआर्यमनने टि्वटमध्ये म्हटले आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत त्यांच्या समर्थक २२ आमदारांनीही राजीनामा दिल्याने मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार कोसळण्याची चिन्हे आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी सकाळी मोदी आणि शहा यांची भेट घेतली. त्यांनी या भेटीनंतर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला.